Headlines

बेकिनकेरेच्या वृद्धाला परिचितानेच लुटले अडीच लाखांना


सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल

  त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : बेकिनकेरे, ता. बेळगाव येथील एका वृद्धाला त्यांच्याच परिचिताने ठकवले आहे. लेबरकार्ड करून देण्याचे सांगून मोबाईल व आधारकार्ड घेऊन त्या वृद्धाच्या बँक खात्यातील 2 लाख 60 हजार रुपयांहून अधिक रक्कम टप्प्याटप्प्याने आपल्या बँक खात्यात त्याने वळविली आहे.

हा प्रकार उघडकीस येताच निंगाप्पा इराप्पा सावंत (वय 75) राहणार बेकिनकेरे या वृद्धाने सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. वैभवनगर येथील सादिक इनामदार या तरुणावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निंगाप्पा यांच्यासोबतच खासगी कंपनीत काम करणाऱ्या सादिकने मार्च 2026 मध्ये त्यांचा मोबाईल व आधारकार्ड नेले होते. सायंकाळी हे दोन्ही परत दिले. त्यानंतर लेबरकार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगत तब्बल 25 ते 30 वेळा सादिकने निंगाप्पा यांच्याकडून मोबाईल व आधारकार्ड घेतले आहे. त्यानंतर परतही आणून दिले आहे.

आपल्या बँक खात्यातील 2 लाख 60 हजार रुपये हडपल्याचे लक्षात येताच निंगाप्पा यांनी बँकेत चौकशी केली. त्यावेळी फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या एका बँक खात्याकडून 2 लाख 26 हजार 584 रुपये तर आणखी एका बँक खात्यातून 34 हजार रुपये असे एकूण 2 लाख 60 हजार 584 रुपये परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले आहे.

13 मार्च 2026 ते 25 जून 2026 या काळात टप्प्याटप्प्याने निंगाप्पा यांच्या बँक खात्यातून रक्कम हडप करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून फसवणूक प्रकरण दाखल करून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. तब्बल दहा वर्षे सोबत काम करणाऱ्या कामगारानेच वृद्धाला लुबाडल्याच्या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत