Yuzvendra Chahal News : टीम इंडियातून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहलचा इंग्लंडमधील दमदार फॉर्म कायम आहे. सॉमरसेटविरुद्ध १० षटकांत ३५ धावा देत तीन विकेट्स घेत चहलने नॉर्थम्प्टनशायरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघातून सध्या बाहेर असलेला युझवेंद्र चहल इंग्लंडच्या देशांतर्गत वन-डे कपमध्ये मात्र चांगलाच फॉर्मात आहे. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना चहलने सॉमरसेटविरुद्ध पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवली. १० षटकांत अवघ्या ३५ धावा देत त्याने तीन महत्त्वाचे बळी घेतले. चहलच्या या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर नॉर्थम्प्टनशायरने सॉमरसेटचा डाव १८५ धावांत गुंडाळला आणि सात विकेट्स राखून सामना जिंकला.
चहलची फिरकी, सॉमरसेटची फलंदाजी ढेपाळली
सॉमरसेटविरुद्ध चहलसोबत रॉब किओघनेही शानदार गोलंदाजी केली. त्याने चार विकेट्स घेतल्या. चहलने मात्र मधल्या आणि खालच्या फळीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने आर्ची वॉनला १८ धावांवर यष्टीचीत केले. त्यानंतर जॅक लीच (९) आणि जेक बॉल (७) यांना यष्टीमागे झेलबाद केले. त्यामुळे सॉमरसेटचा डाव ४७ षटकांत १८५ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ५० षटकांच्या या स्पर्धेत चहलची कामगिरी सातत्याने लक्षवेधी ठरत आहे. प्रत्येक सामन्यात तो प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण करताना दिसत आहे. त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर त्याचा फॉर्म किती चांगला आहे हे स्पष्ट होते.
चहलने आतापर्यंत सात सामने खेळले असून २१.००च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो मेट्रो बँक वन-डे कपमध्ये परदेशी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे नॉर्थम्प्टनशायरसह त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साह आहे.
चहलच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची चर्चा होऊ शकते. भारतीय संघात सध्या कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू आहेत. त्यामुळे चहलसमोर स्पर्धा निश्चितच कठीण आहे.
मात्र, एकदिवसीय क्रिकेटचा मोठा अनुभव आणि विकेट घेण्याची क्षमता ही चहलची जमेची बाजू आहे. इंग्लंडमधील ही कामगिरी त्याने अशीच सुरू ठेवली, तर आगामी एकदिवसीय मालिकांसाठी निवड समिती त्याच्या नावाचा पुन्हा विचार करू शकते.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा