Pune Rain: एल निनोमुळे पुणे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहरात एक दिवसाआढ पाणीपुरवठा केला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने पाणीकपातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे पुण्यातील दिवसाआड पाणीकपात स्थगित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात झालेला पाऊस व धरणसाठ्यात झालेली मोठी वाढ लक्षात घेता पुणे महापालिकेने तूर्त पाणीकपात लागू न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने पर्जन्यमान कमी राहण्याचा इशारा हवामान विभागाने पूर्वीच दिला आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफूटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.
याखेरीज वॉशिंग सेंटर बंद करणे, बांधकामांसाठी पिण्याचे पाणी न वापरणे आदी नियम लागू केले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत झाली. एक जुलैनंतर शहरात दमदार पाऊस झाला. या पावसाने जूनमधील कमतरता भरून काढून जुलैमधील सरासरीही ओलांडली. शहरापेक्षाही धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. खडकवासला धरण साखळीत सध्या १६.६४ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा २०.४२ टीएमसी होता. पाच दिवसांपूर्वी सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात १३ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच नऊ ते ११ जुलै दरम्यान संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शहरात मुक्कामी असल्याने १२ जुलैपर्यंत दिवसाआड पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
पाणीकपात रद्द करण्याची मुदत आज (रविवार) संपणार आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा पाणीकपात होणार का, असा सवाल पुणेकर करीत होते. पाणीकपात पुन्हा सुरू करायची की नाही, याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. धरणासाठा वाढल्याने पाणीकपात नको, अशी भूमिका महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महापालिकेने सोमवारपासून अचानक पाणीकपात लागू केल्यास त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता होती.
‘पालखी मुक्कामासाठी पाणीकपात रद्द केल्याच्या निर्णयात अद्याप बदल केलेला नाही. पुन्हा पाणीकपातीचा निर्णय होईपर्यंत नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल. जुन्या वेळापत्रकानुसार दिवसाआड पाणीकपात पुन्हा सुरू करू नये, अशा सूचना पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पाणीकपातीसंदर्भातील निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होईल,’ असे पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा