Headlines

दीड दमडी: एक कविता द्या मज आणुनि… – deed damadi tambi durai special article on shivsena ubt maharashtra politics


-तंबी दुराई

एक कविता द्या मज आणुनि
वाचीन मी जी प्राणपणाने,
भेदून टाकील सगळी गगने
तीव्र तिच्या त्या शब्दसंभाराने
एक कविता द्या मज आणुनि…

कविते, कुठे लपली होतीस
तुझ्या शब्दांचे बाण घेउनि?
कविते, कुठे लपली होतीस
परिस्थितीची जाण घेऊनि?
जुनीच ताकद पुन्हा मिळाली
जणू तुझ्या आशयाला नव्याने
एक कविता द्या मज आणुनि…

कुणी हिणवती, म्हणती
कविता हे शस्त्र कमजोरांचे,
कुणा वाटते जिकडे तिकडे
तण माजले कागदी विचारांचे,
अशा मडक्यांची घ्यावी परीक्षा
वाजवुनि आता कुंभाराने
एक कविता द्या मज आणुनि…

शब्द रोखुनि बघती त्यातून
कधी स्पृहाची कविता होते,
वर्तमानाचे वास्तव सांगत
दाहक दाहक जाळत जाते,
असंतोषाच्या लाख चुली
पेटतील शब्दांच्या विस्तवाने
एक कविता द्या मज आणुनि…

विंदांच्या कवितेतले सब घोडे
बारा टक्क्यांनी विकले गेले,
देणाऱ्यांचे हात रिकामे झाले
तरी घेणारे हात पसरत गेले,
तोच रस्ता, तोच पाय, तोच खड्डा
खोदला त्याच त्याच कुदळीने
एक कविता द्या मज आणुनि…

कहते है भगवान की लाठी में
आवाज नही है होती,
पर अतुल की कविता में
पुलिस की लाठी है रोती,
दिव्याने दिवा पेटतो तसा
शब्दही पेटतो शब्दाने
एक कविता द्या मज आणुनि…

कुसुमाग्रज म्हणाले, लढ;
पण हात ठेवायाला पाठ नाही,
कोलंबस गातोय गर्वाचे गीत
पण मान त्याची ताठ नाही,
विश्वाला झाली क्षयाची बाधा
पृथ्वीच्या नव्या प्रेमगीताने
एक कविता द्या मज आणुनि…

इतिहासाची तलवार घेउनि
कोल्हे अमोल लढती जरी,
अटीतटीच्या वेळी त्यांच्या
कवितेचा कागद येई करी,
व्यवस्थेच्या छाताडावर आता
होतील वार शब्दांच्या भाल्याने
एक कविता द्या मज आणुनि…

काढूनि चष्मा डोळ्यांवरचा
मर्ढेकरांनी पुन्हा पाहावे,
पापा-पुण्याची करीत मोजणी
बोरकरांनी गंगौघाचे पाणी प्यावे,
आणि गळण्या नकार द्यावा
पक्व झालेल्या फळाने
एक कविता द्या मज आणुनि…

वाटले होते सुकली, आटली सरिता
वाटले होते संपली, हरली कविता,
जंतर मंतर कुणी हे केले
कवितेला पालवी फुटली,
आषाढातला पाऊस लेवून
ती हिरवी हिरवी नटली
आणि विव्हळली मग ती
सभोवताली पाहून दुःखाने
एक कविता द्या मज आणुनि…

कोठे होते सुरू आणि संपते कोठे
कविता, तिलाही ठाऊक नाही,
ती प्रेमळ आहे, कधी कठोर आहे
पण खोटी खोटी भावुक नाही,
केशवसुत, झूठ बोलू नका
स्पष्ट सांगा, काय म्हणायचे होते
तुतारी बितारी नव्हे, तुम्हाला
‘एक कविता आणून द्या’ म्हणायचे होते…

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत