Headlines

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात बोमा तंत्रज्ञानाने 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर:वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत




ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात (TATR) भक्ष्यांची घनता संतुलित करण्यासाठी वनविभागाने ‘बोमा तंत्रज्ञाना’चा वापर करत ३० चितळांचे यशस्वी स्थलांतर केले आहे. प्रकल्पाच्या ‘सक्रिय पर्यावरणीय व्यवस्थापन’ धोरणांतर्गत, अधिक भक्ष्यांची संख्या असलेल्या भागातून कमी संख्या असलेल्या भागात तृणभक्षक प्राण्यांना हलवण्यात आले आहे. यामुळे वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, गाभा क्षेत्रातील कोळारा परिक्षेत्रातील ‘जामनी गवताळ प्रदेशातून’ एकूण ३० चितळांना कोळसा परिक्षेत्रातील ‘कोळसा गवताळ प्रदेशात’ सुरक्षितपणे सोडण्यात आले. ३० जून २०२६ रोजी १६ चितळ (९ मादी व ७ नर) आणि १ जुलै २०२६ रोजी १४ चितळ (११ मादी व ३ नर) यांचे स्थलांतर करण्यात आले. अत्यंत कडक सुरक्षा उपाय, मॉक ड्रिल आणि अचूक नियोजनामुळे संपूर्ण मोहिमेदरम्यान एकाही प्राण्याला दुखापत झाली नाही, म्हणजेच ‘झिरो कॅज्युअल्टी’सह ही मोहीम यशस्वी झाली. या स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ‘बोमा तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे चितळांना कोंडून थेट विशेष डिझाइन केलेल्या वाहनांमध्ये चढवण्यात आले, ज्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. राज्य शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम १२ अंतर्गत एकूण ८० चितळांच्या स्थलांतराची परवानगी दिली आहे. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला आणि उपसंचालक (गाभा) आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विवेक नातू, अनिरुद्ध धागे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, रुंदन काटकर व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. यापूर्वी गेल्या वर्षीही याच पद्धतीने जामनी मैदानातून १०७ चितळांचे नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आले होते. उर्वरित ५० चितळांचे स्थलांतर आगामी टप्प्यात केले जाणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत