दीर्घकाळ झुंजत होत्या कर्करोगाशी: आज सांत इनेज येथे अंत्यसंस्कार: तीनवेळी आमदार बनलेल्या पहिल्या महिला
ताळगांव मतदारसंघाच्या भाजप आमदार आणि माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात (वय 55 वर्षे) यांचे काल रविवारी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात दु:ख व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पती व पणजीचे आमदार तथा मंत्री बाबुश मोन्सेरात, दोन पुत्र रोहित (पणजी महापौर) व अमित, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेली जवळपास 20 वर्षे त्या सक्रिय राजकारणात होत्या. या कालावधीत त्यांनी विविध पदे भूषवली आणि गोव्यासाठी योगदान दिले. त्या 2019 ते 2022 पर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात एकमेव महिला कॅबिनेट मंत्री होत्या.
त. भा. प्रतिनिधी
पणजी : वर्ष 2005 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यावर्षी त्या प्रथम उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष बनल्या. त्यानंतर वर्ष 2007 मध्ये त्यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटीक पार्टीतर्फे (युगोडेपा) प्रथम विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना अपयश आले. त्यांना 5868 अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. आपले काम चालू ठेवताना वर्ष 2009 मध्ये त्या ताळगांवच्या सरपंच झाल्या. पुढे 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाग घेतला आणि ताळगांवच्या मतदारांनी त्यांना आमदार केले. पुन्हा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी होऊन आमदार झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये राजकीय घडामोडी होऊन त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला दि. 10 जुलै 2019 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर लगेच 13 जुलै 2019 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मागील 2022 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विजय मिळवला.
सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या गोव्याच्या पहिल्या महिला आमदार
विधानसभा निवडणुकीत 2012, 2017 व 2022 मध्ये सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या त्या गोव्याच्या पहिल्या महिला आमदार होत्या. गोवा राज्य महिला आयोगाच्या समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून तीन वर्षे काम केले. ताळगांव मतदारसंघातील विकासकामे आणि महिला सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. सलग तीन वेळा आमदार म्हणून ताळगांवचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे गोव्याने एक महिला नेत्या गमावली आहे.
अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी मान्यवरांची गर्दी
जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताळगांव मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार तसेच गोव्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी ताळगांव येथील निवासस्थानी गर्दी केली. पणजी मनपाचे नगरसेवकही उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली दिली.
निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, विधानसभेतील इतर आमदार, मंत्रिमंडळातील मंत्री यांनी ताळगांव येथे जाऊन मंत्री बाबुश मोन्सेरात आणि महापौर रोहित मोन्सेरात यांचे सांत्वन केले. राजकीय क्षेत्रातील लोकांनी ताळगांवच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.
गोव्याने अनुभवी लोकप्रतिनिधी गमावला : मुख्यमंत्री
जेनिफर मोन्सेरात या 2012 पासून आपल्यासोबत होत्या. त्यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले असून महसूल, रोजगार खात्याची जबाबदारी त्यांनी योग्य पद्धतीने सांभाळली. राज्यासाठी आणि ताळगांवच्या जनतेसाठी त्यांनी चांगले काम करुन योगदान दिले असून ते कायमचे स्मरणात राहाणार आहे. गोव्याने एक अनुभवी लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असून आत्म्यास शांती लाभो अशा शब्दात डॉ. सावंत यांनी भावना व्यक्त केल्या.
विधानसभेतील दोन जागा रिक्त
जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे गोवा राज्य विधानसभेतील आमदारांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. कृषीमंत्री असलेले रवी नाईक यांचे ऑक्टोबर 2025 मध्ये निधन झाल्यामुळे एक जागा रिकामी झाली होती तर आता जेनिफर यांचे निधन झाल्याने आणखी एक जागा म्हणजे दोन जागा रिकाम्या झाल्याचे समोर आले आहे.
आज सायंकाळी 4.30 वा. हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार
दिवगंत जेनिफर मोन्सेरात यांच्यावर आज सोमवार दि. 20 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वा. सांत इनेज, पणजी येथील हिंदू स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव ताळगांव येथील सेंट मायकल चर्चमध्ये दुपारी 3.30 वा.पासून अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथे प्रार्थना सभा होणार असून त्यानंतर अंत्ययात्रा सांत इनेज स्मशानभूमीकडे निघणार आहे. हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात दोन दिवस दुखवटा
आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाबद्दल राज्यात रविवार 19 व सोमवार 20 जुलै असे दोन दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे. तशी अधिसूचना सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी केली आहे. त्या काळात राष्ट्रीय तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकावण्यात येणार असून कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
पार्थिव असेल तिथे भरपूर फुले असावी…
जेनिफर मोन्सेरात यांनी पती बाबुश यांना सांगितले होते की, आपण गेल्यानंतर आपला देह जिथे असेल त्या ठिकाणी भरपूर फुले असावी. आपला मृतदेह हिंदू स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यांची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुले मागविण्यात आली आहेत. स्मशानभूमीत नेताना संपूर्ण गाडी फुलांनी सजविली जाणार आहे.तसेच सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील
