Headlines

कोरड्या जूननंतर जुलैमध्येही दिलासा नाही? सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; संपूर्ण महिन्यासाठी IMDचा अंदाज जाहीर| Maharashtra Times


म.टा प्रतिनिधी मुंबई/वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्के इतकाच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. देशात जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस हा सुमारे २८०.४ मिलीमीटर इतका गृहित धरला जातो.

देशातील काही भागांना मात्र या तुटीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत; तसेच पूर्व द्वीपकल्पीय प्रदेशातील काही ठरावीक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका निवेदनात सांगितले, की जुलै महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत आणि पूर्व द्वीपकल्पीय क्षेत्रातील काही भाग या ठिकाणी पाऊस सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे, एखाद्या विशिष्ट प्रदेशात ठरावीक कालावधीत नोंदवलेल्या पावसाची आकडेवारी असते.

दिवसभर संततधार

मुंबईमध्ये मंगळवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला होता. दिवसभरात मुंबईमध्ये संततधार होती. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाबा येथे २५.४, तर सांताक्रूझ येथे १४.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामुंबई परिसराचा ऑरेंज ॲलर्ट ४ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

पावसाने कोकणात जोर धरला असला तरी यंदाच्या जूनमध्ये या विभागामध्ये पावसाची तूट आहे. मुंबई शहराने सरासरीची श्रेणी गाठली आहे, मात्र कोकण विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली आहे. या पार्श्वभूमीवर जुलैमधील पहिल्या १० दिवसांमध्ये पाऊस दिलासा देईल, अशी भारतीय हवामान विभागाने केलेली घोषणा महत्त्वाची आहे. कोकण विभागात ४ जुलैपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई शहरामध्ये १ जून ते ३० जून या कालावधीत ४४१.१ मिलीमीटर, तर मुंबई उपनगरामध्ये ४१६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहरातील पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी कमी, तर उपनगरांतील पाऊस सरासरीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी नोंदला गेला. शहरामध्ये १९ टक्क्यांची तूट असल्याने हा पाऊस सरासरीच्या श्रेणीत असल्याची नोंद झाली, तर उपनगरांमध्ये मात्र तूट असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त तूट नोंदली गेली. ठाणे जिल्ह्यात केवळ ११६.६ मिलीमीटर पाऊस पडला असून, ठाणे जिल्ह्यात ७५ टक्के तूट नोंदली गेली.

आज मुसळधार ते अतिमुसळधार

मुंबईमध्ये आज, १ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. २ जुलैपासून पावसाचा जोर आणि व्याप्ती वाढेल. २ जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज, तर रायगडला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. महामुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडेल.

पुण्यात जूनमध्ये केवळ ६४ मिलीमीटर

पुण्यात जूनच्या सरासरीच्या निम्मादेखील पाऊस पडला नाही. शहरात एक ते ३० जूनदरम्यान केवळ ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा हंगाम सुरू होऊनही २० जूनपर्यंत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदवहीत पावसाच्या रकान्यासमोर शून्य आकडा लिहिलेला होता.

Maharashtra TimesMaharashtra Rain Update : 2 ते 4 जुलै तुफान पाऊस पडणार, हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट जारी

नाशिकमध्ये हलक्या सरी

शहरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. शहरात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या, तर काही उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चार तासांत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सातपूर, सिडको, कॉलेजरोड, सीबीएस, पंचवटीसह नाशिकरोड, अंबड परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा वेग मंदावल्याचा अनुभव आला. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत