Headlines

कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times


म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बस कल्याण आगारात जाणार नसल्याचे सांगून प्रवाशांना पत्रीपुलावर किंवा सूचक नाक्यावरच उतरवले जात आहे. या प्रवाशांना रिक्षासाठी तब्बल १०० ते १५० रुपये मोजून आधी कल्याण स्टेशन आणि त्यानंतर तिथून आपल्या अपेक्षित स्थळी जावे लागते. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा ‘द्राविडी प्राणायाम’ कधीतरी संपावा आणि एसटी प्रवाशांना किमान कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरापर्यंत बस सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्रासलेल्या प्रवाशांकडून होत आहे.

Maharashtra TimesKalyan Junction: ट्रेनला 5 तास विलंब, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?

पाच वर्षांनंतरही काम अपूर्णच

कल्याण स्टेशन परिसरात ‘सॅटीस’सह परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१पासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांतही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. याच प्रकल्पाचा भाग म्हणून एसटी आगाराचा विकास आणि बहुउद्देशीय बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. हे काम आणि उड्डाणपूल आगारात उतरवण्याच्या कामासाठी कल्याण आगार विठ्ठलवाडीत हलवण्यात आले आहे.

‘वर्षभरात एसटी प्रवाशांना कल्याण आगारातून प्रवास करता येईल,’ असे आश्वासन स्मार्ट सिटी आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, इमारतीचे काम अजूनही पायापर्यंतच रखडलेले आहे. तर पडघा, भिवंडीकडे जाणाऱ्या बसेससाठी रेल्वे स्थानक परिसरात तात्पुरती जागा दिली असली, तरी अनेक गैरसोयी आहेत..

अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि कोकणातून येणाऱ्या गाड्यांना कल्याण डेपोत प्रवेश बंद आहे. या गाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी आगारात जातात. त्यामुळे पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरात कल्याण पश्चिमेकडील प्रवाशांना उतरवले जाते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडे सामानाचे मोठे ओझे असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरलेल्या प्रवाशांची असहाय्यता पाहून रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत त्यांची लूट करतात.

Maharashtra TimesKalwa-Airoli Rail Corridor: कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य, ‘कळवा ते ऐरोली रेल लाइन’चा मार्ग मोकळा; मध्य रेल्वेकडून काम सुरू

प्रवाशांचे मोठे हाल

“कल्याणातील डेपो आणि आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाकडून डिसेंबर २०२६ची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण झाले, तर प्रवाशांचे हाल कमी होतील.” चेतन देवधर, आगार व्यवस्थापक

“अलिबागहून येणारी बस सूचक नाक्यावर किंवा डोंबिवली मार्गे आली तर पत्रीपुलावर प्रवाशांना उतरवते. तिथून कल्याण पश्चिमेकडे जाण्यासाठी रिक्षाचालक थेट १०० रुपयांची मागणी करतात. अर्ध्या रस्त्यात उन्हातान्हात होणाऱ्या हालाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.” भूषण जोशी, प्रवासी

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत