Headlines

'आधीच मासिक पाळी, वॉशरूमलाही जाता आलं नाही':मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 9 तासांच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा धक्कादायक अनुभव




मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनाही बसला. मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक दोनच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली. या प्रचंड वाहतूक कोंडीत अनेक प्रवाशांप्रमाणेच मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरही तब्बल 9 तास अडकून पडली होती. या संपूर्ण प्रसंगाबाबत तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपला अत्यंत वेदनादायी अनुभव मांडला आहे. धनश्रीने सांगितले की, आतापर्यंत मुसळधार पाऊस, अपघात किंवा दरड कोसळल्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याच्या बातम्या ती फक्त पाहत होती. मात्र यावेळी स्वतः त्या परिस्थितीचा सामना करावा लागला. तब्बल नऊ तास गाडीत अडकून राहणे अत्यंत थकवणारे आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरल्याचे तिने सांगितले. या काळात तिला मासिक पाळी सुरू होती. त्यामुळे वॉशरूमला जाण्याची तीव्र गरज असूनही बाहेर पडता येत नव्हते. फूड कोर्टवर जाऊन काही खाण्याचीही इच्छा होती, मात्र आजूबाजूला गुडघाभर पाणी साचल्याने बाहेर पडणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत आजारी पडण्याचा धोका पत्करणेही शक्य नव्हते, कारण पुढील काही दिवस सलग शूटिंगचे नियोजन असल्याचे तिने सांगितले. धनश्रीने पुढे सांगितले की, तिचा चालक वारंवार पुण्याकडे परत जाण्याचा सल्ला देत होता. मात्र शूटिंगची जबाबदारी आणि दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी तिने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. वाहतूक हळूहळू सुरू झाल्यानंतर अखेर ती शूटिंगच्या सेटवर पोहोचली. या अनुभवाबाबत भावना व्यक्त करताना धनश्री म्हणाली, “निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही. पण देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, अशा संकटांमुळे कोणाचं जगणं असह्य होऊ नये.” सोमवारी पहाटे मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक २ च्या प्रवेशद्वाराजवळ मोठी दरड कोसळल्यामुळे सुमारे १०० टनांचा माती-दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे हजारो वाहनचालक आणि प्रवासी अनेक तास महामार्गावर अडकून पडले. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि अपुरी सुविधा यामुळे अनेकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. धनश्री काडगांवकर ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील ‘नंदिनी’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. आजही ती विविध मालिका आणि अन्य प्रकल्पांमध्ये सक्रिय असून सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या अनुभवामुळे मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांसह कलाकारांनाही किती मोठा फटका बसतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत