![]()
हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात भटक्या कुत्रांनी धुमाकुळ घातला असून सात बालकांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. या बालकांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर गुरुवारी ता. 20 उपचार केले जात आहेत. हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. विशेष म्हणजे अचानक भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरीकांसाठी चांगलीच डोकेदुःखी बनली आहे. शहरात ठिकठिकाणी कुत्र्यांनी ठाण मांडले आहे. सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत. दरम्यान, शहरातील रिसालाबाजार भागात बुधवारी ता. 19 सायंकाळपासून भटक्या कुत्र्यांनी विद्यार्थ्यांवरच हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. या कुत्र्यांनी सायंकाळी उशीरापर्यंत तब्बल आठ विद्यार्थ्यांचे लचके तोडले आहे. कोणच्या हाताला तर पायाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे या परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून शालेय विद्यार्थ्यांसह महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये श्लोक शिंदे (12), श्रृती सरकटे (7), दक्ष कहार (4), वंश जमदाडे (7), हर्षवर्धन कांबळे (6), शेख मुद्दशीर (11) आर्यन राठोड (4) यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासर्वांवर उपचार सुरु असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
Source link
हिंगोलीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ:रिसालाबाजार एकाच दिवशी सात बालकांना घेतला चावा, पालिका प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
