Headlines

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी


सावंतवाडी | शहर वार्ताहर : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा प्रभारी कार्यभार बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशाल रेड्डी यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार त्यांनी मंगळवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

डॉ. रेड्डी हे २०१२ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सेवेला देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरुवात केली. त्यानंतर २०१६ मध्ये संभाजीनगर येथे वैद्यकीय उच्च शिक्षण पूर्ण केले. २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे झाली. सन २०२४ ते २०२५ या कालावधीत त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावली. एप्रिल २०२६ मध्ये त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली झाली. हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ म्हणून त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार केले असून, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. विशाल रेड्डी म्हणाले, “रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील. सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रुग्णांना उत्तम उपचार, आवश्यक औषधे आणि इतर सुविधा वेळेवर मिळतील, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत