जितक्या प्रेमानं आणि भक्तीनं मी हरीचं नामस्मरण करीन, तितका तो त्या मूर्तीत मला दिसायला लागला.

वाचता वाचता अचानकपणे वामन पंडिताचा एक श्लोक समोर आला. ‘हरिपण हरिनामे धातुमूर्तीस आले। हरिमय हरिनामे विश्वसंतांसि जाले।। भवभय हरिनामे साधकांचे पळाले। वाद वाद वाद जिव्हे, रामनामे रसाळे ।।’ श्लोक वाचला आणि जे वाचत होतो, ते बंद करून ठेवलं. मनात हाच श्लोक येत राह्यला. हळूहळू त्या श्लोकाचा मथितार्थ मनात झिरपायला लागला. वाटलं, वामन पंडितांनी किती मोठी गोष्ट किती सोप्प्या शब्दांत सहजपणं सांगितली आहे. मुळात ही एक धातूची मूर्ती आहे.
तिच्याकडं मी पाहिलं आणि मनाला वाटलं, अरे! हा तर हरीच आहे. त्याचंच सगुण रूप या मूर्तीतून साकार झालं आहे. ते माझ्या मनाला असीम आनंद देत आहे. त्या आनंदाला चटावलेलं मन मग सतत हरीचाच जप करू लागलं. जसजसं मी ते नाव घ्यायला लागलो, तसतसा त्या मूर्तीत मला हरी दिसायला लागला. त्याचं रूप डोळ्यांसमोर दिसायला लागलं.
बघता बघता त्या मूर्तीत मला हरीची विविध रूपं दिसायला लागली. नजर जाईल तिकडं हरीच आहे, असा भास व्हायला लागला. आणि मग मनातलं सारं भय कुठच्या कुठं पळालं. वाढत्या वयासोबत येणारे आजार, सांधे आणि स्नायूदुखी, मंदावलेली चाल, जिना चढताना घ्यावा लागणारा आधार… वाढतं वय असं सारखं चहूबाजूंनी येऊन भिडत असताना मनात भयही दाटून येत होतं. पण तोंडात हरीचं नाव आलं. त्यानं बरं वाटलं. त्या बरं वाटण्याच्या ओढीनं हरी, हरी, हरी… आणि मग सारं भय दूरवर गेलं. माझ्यापासून ते लांब गेलं. ही किमया या हरीच्या नावाची. त्या निर्गुण निराकार शक्तीच्या उपासनेचा हा किती सोपा मार्ग वामन पंडितांनी या श्लोकात सांगितला आहे.
मनात आलं, समजा मी हरीऐवजी राम किंवा शंकर किंवा दत्त… कुठलंही नाव घेत राह्यलो असतो, तर परंपरेनं त्या नावाला दिलेलं रूप मला दिसत राह्यलं असतं. सततच्या नामस्मरणानं ती जादू केली असती. मग त्याच रूपाचं गारुड मनावर पडलं असतं. त्यातच मन हवा असलेला आधार शोधत राह्यलं असतं. सततच्या नामस्मरणानं तो दिलाच असता!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांनी विज्ञान व साहित्यविषयक विपुल लिखाण केले आहे.)

