Headlines

श्रमदानातून उभारला ‘काजूपार्क’; श्रीघाटमध्ये निसर्ग संवर्धनासह रोजगाराची पेरणी


Nashik News: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाटच्या ग्रामस्थांनी कष्टाने निसर्गाच संवर्धन करत रोजगाराची पेरणी केली. २९२ हेक्टर वनक्षेत्राचे संवर्धन करताना १० हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन सुरू केले.

_ काजु पार्क
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी ,नाशिक: जिल्ह्यातील वनसंपदेच्या रक्षणार्थ श्रीघाट पाडा तृतीय क्रमांकावर असून, त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील देवगांव परिमंडळातील वनधिकारी आणि ग्रामस्थांच्या निसर्ग संवर्धनासह आर्थिक विकासाची जबाबादारी चोख सांभाळत आहेत. वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कवले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानाची चळवळ पाड्यात उभी राहिली.

आणि काजूची वनराई बहरत गेली

वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या पथकाच्या नेतृत्त्वात सध्या संवर्धन सुरू आहे. वनपाल सचिन दिवाणे, वनरक्षक खंडू दळवी यांचे पथक तेथे लक्ष ठेऊन आहेत. ग्रामस्थांनी पाड्यालगत चर खणल्यानंतर काजूची वनराई बहरत गेली आणि हळूहळू काजू विक्रीतून होणारा नफा ग्रामस्थांची उमेद वाढविणारा ठरला. तेव्हापासून १० हेक्टर व्यतिरिक्त जंगलातही काजू व आंब्याचे बीज रोपण ग्रामस्थांनी सुरू केले.

काजूपार्क

त्यामुळे निसर्गाला ‘काजूपार्क’ नाव देण्यात आले. विविध प्रजातीच्या वृक्षांनी नटलेल्या जंगलात बिबट्या, मोर, तरस, रानडुक्कर यासह अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. पाड्यावरील सर्व ग्रामस्थांच्या श्रमदानातून दुर्गम भागातील निसर्गाचे संवर्धन होण्यासह स्वयंविकासासाठीही निसर्गाची देणगी महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.

पर्यटकांना थेट विक्री

मार्च-एप्रिल महिन्यात काजू घोटीच्या बाजारपेठेत ग्रामस्थ विक्री करतात. त्यातून येणारे उत्पन्न समितीच्या खात्यावर जमा होते. त्यानंतर एकत्रित उत्पन्नाचे भाग करून ग्रामस्थांना पैसे मिळतात. दुसरीकडे पाड्यावरील हिरवाई पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मधुर आंब्याची थेट विक्री केली जाते. त्यातूनही उत्पन्नात भर पडत असल्याने काजू पाठोपाठ आमराई फुलविण्याचा प्रयत्न निसर्ग संवर्धनासाठी कौतुकास्पद आहे.

Maharashtra TimesNashik News: ‘त्या’ दुकानदारांना नोटिसा द्वारका चौकातील जागेचे प्रकरण ; दीडशे कोटींची जागा वाचविण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव

काजूच्या रोपांची लागवड पंधरा वर्षापूर्वी

“श्रीघाट पाड्यालगत असलेल्या राखीव वनात अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, वनवणवा रोखणे यासह चराई बंदी ,कुऱ्हाड बंदीची कठोर अंमलबजावणी केली जाते.ग्रामस्थांच्या श्रमदानातून हजारोंच्या संख्येने काजूच्या रोपांची लागवड पंधरा वर्षापूर्वी केल्याने संवर्धनासह वन्यजीव सुरक्षा वाढली आहे.”
अशी प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर चे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिली.

Maharashtra TimesNagpur News: भटक्या जनावरांची समस्या सुटणार ; नंदग्राम गो- आश्रय प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण

१७ वर्षाच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून वनक्षेत्राचे संवर्धन

गावाजवळ बहरलेल्या जंगलाच्या रक्षणासाठी पुढाकार घेताना आर्थिक विकासाचीहीवाट शोधणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाटाच्या ग्रामस्थांनी काजूपार्क चा अभिनव प्रयोग साकारला आहे.१७ वर्षाच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून २९२ हेक्टर वनक्षेत्राचे संवर्धन करताना १० हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन सुरू झाले आहे. दुर्गम भागातही निसर्गसंवर्धन आणि व्यवसायवृध्दी यांचा समतोल साधत ग्रामस्थांनी शाश्वत विकासाचा आदर्श उभा केला.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा