Headlines

शक्तीपीठ महामार्गाविरोधात बांद्यात सामूहिक गाऱ्हाणे


बांदा /प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांदा शहर परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बांद्याचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर व ग्रामदैवत श्री भूमिका देवी मंदिरात ग्रामस्थांनी सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.
महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे सुपीक शेती, बागायती, घरे, व्यावसायिक आस्थापने तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. यामध्ये ब्राम्हण देवळाचा देखील समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून, प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
बांदा परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकूण ११२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींमध्ये जमिनींचे होणारे नुकसान, विस्थापनाचा प्रश्न, पर्यावरणीय परिणाम तसेच शेती व व्यापारावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे. बांदा शहरातील २१४ एकर क्षेत्र, डेगवे १०२ एकर, पडवे माजगाव ४३ एकर, पडवे ३०, असनीये ४५ एकर, दाभील २७ एकर, घारपी ८ एकर, फणसवडे १४० एकर, नेने २५ एकर, उडेली ६० एकर, केगद १६० एकर, झोळंबे ७० एकर, फुकेरी ४५ एकर, कुंभवडे ६५ एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.
सामूहिक गाऱ्हाण्यावेळी उपस्थितांनी “शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली बांदा परिसराचा विकास नव्हे, तर विनाश होणार आहे,” अशी भावना व्यक्त करत शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी केली. स्थानिकांच्या भावना आणि उपजीविकेचा विचार करून प्रस्तावित आराखड्यात बदल करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
बांदा परिसरातील वाढता विरोध आणि मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या हरकतींमुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता केवळ स्थानिक न राहता राज्यस्तरावरही चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, अरुण मोर्ये, गजानन गायतोंडे, मकरंद मोर्ये, समीर सावंत यांच्यासह बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत