Headlines

वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडला एकच उत्तर दिलेलं, मैदानातही तेच केलं! हरभजनने सांगितला बॉस बेबीचा भन्नाट किस्सा, काय म्हणाला?


Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या निर्भय फलंदाजीची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने वैभवच्या आयपीएल पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे. राहुल द्रविडने विचारलेल्या प्रश्नावर वैभवने काय उत्तर दिलं आणि पहिल्याच चेंडूवर काय केलं, जाणून घ्या.

Vaibhav sooryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने अल्पावधीतच क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. डावाच्या सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळण्याची त्याची तयारी आणि निर्भय वृत्तीची अनेकदा चर्चा होते. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही वैभवच्या या शैलीचा चाहता आहे. हरभजनने वैभवचं कौतुक करताना त्याला ‘अविश्वसनीय’ प्रतिभा म्हटलं. याचवेळी त्याने वैभव आणि राहुल द्रविड यांच्यातील एक खास किस्साही सांगितला.

‘पहिला चेंडू आवाक्यात असेल तर फटका मारेन’

झिम्बाब्वे मालिकेपूर्वी जिओस्टारशी बोलताना हरभजनने वैभवच्या निर्भय फलंदाजीचं कौतुक केलं. वैभव ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे, तसा खेळ यापूर्वी पाहायला मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं. हरभजन म्हणाला, ” वैभव सूर्यवंशी आज ज्या प्रकारचा खेळ दाखवत आहे, तो यापूर्वी कोणीही पाहिला नाही. तो अविश्वसनीय आहे. एक विलक्षण प्रतिभावान खेळाडू आहे. मला वाटत नाही की मी यापूर्वी कधी अशी प्रतिभा पाहिली असेल किंवा अनुभवली असेल.” याचवेळी हरभजनने राजस्थान रॉयल्समधील वैभवच्या सुरुवातीच्या दिवसांशी संबंधित एक किस्सा सांगितला. राहुल द्रविड राजस्थानच्या संघाचे प्रशिक्षक असताना त्याने वैभवला एक प्रश्न विचारला होता.

द्रविडने वैभवला विचारलं होतं, “पहिल्या चेंडूवर तू काय करशील?” यावर वैभवने उत्तर दिलं, “जर पहिला चेंडू माझ्या आवाक्यात असेल, तर मी तो जोरदार फटकावून खेळेन.” वैभवने आपल्या शब्दांप्रमाणेच कृतीही केली. आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने शार्दुल ठाकूरविरुद्ध षटकार ठोकला.

Maharashtra TimesLalit Modi : ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार! न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाला?

‘निर्भय मानसिकता असलेल्या खेळाडूंना स्वीकारलं जातंय’

हरभजनच्या मते, क्रिकेटमध्ये आता निर्भय मानसिकतेने खेळणाऱ्या युवा खेळाडूंना अधिक स्वीकारलं जात आहे. वैभव कोणत्याही परिस्थितीत आपल्या नैसर्गिक शैलीने खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. हरभजन म्हणाला की, “मला वाटतं सर्वात मोठा बदल हा आहे की, लोक आता निर्भय मानसिकता असलेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या खेळण्याच्या अनोख्या पद्धतीला स्वीकारत आहेत.”

झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमनाची संधी

दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका गुरुवारी हरारे येथे सुरू होणार आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी आयपीएलनंतर वैभवने गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मात्र, पहिल्या तीन टी-२० सामन्यांत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याने अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. आता संजू सॅमसन भारतीय संघात नसल्यामुळे वैभवला अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते.

Maharashtra TimesDavid Warner : मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा डेव्हिड वॉर्नरने कबूल केला; आता पुढे काय होणार, वकिलाने सांगितलं नेमकं काय घडलं?

‘मला माझ्या खेळावर विश्वास’

भारत आणि झिम्बाब्वे मालिकेपूर्वी वैभवने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना मागील काही महिन्यांतील अनुभवाबाबतही भाष्य केलं. तो म्हणाला, “होय, गेल्या चार महिन्यांत अनेक चढ-उतार आले आहेत. हा क्रिकेटचाच एक भाग आहे आणि तो पुढेही घडत राहील. पण मला माझ्या खेळावर विश्वास ठेवावा लागेल आणि संघासाठी माझं १०० टक्के योगदान द्यावं लागेल.” वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.