सावंतवाडी वार्ताहर : सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू असून, या सप्ताहात सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी हाती वीणा घेत विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत विठ्ठल सेवेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हरिनाम सप्ताहानिमित्त दररोज वारकरी भजन, कीर्तन तसेच सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानिमित्त नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी उपस्थित राहून विठ्ठल सेवेत सहभाग घेतला.
यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर तसेच विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी श्री विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
