मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन :‘गोमंतकीय वास्तुशिल्प’ परिषदेचे दिल्लीत उद्घाटन
राज्याच्या शतकानुशतके चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाची सांगड अत्याधुनिक पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाशी घालून आम्ही येथील हवामानास अनुकूल अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सज्ज आहोत. त्याचबरोबर शाश्वत वास्तुशिल्पाच्या बाबतीत गोवा राज्य एक ‘जिवंत प्रयोगशाळा’ बनून देशाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
त.भा. प्रतिनिधी
पणजी : शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित ‘गोमंतकीय वास्तुशिल्प आणि शाश्वतता’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाद्वारे आयोजित या महत्त्वपूर्ण परिषदेस केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती. त्याशिवाय देशातील आघाडीचे वास्तुविशारद, नगररचनाकार, अभियंते आणि धोरणकर्तेही एकत्र आले होते. त्यांनी शाश्वत शहरी रचनेबाबत देशाचा दृष्टिकोन नव्याने घडविण्यावर विस्तृत चर्चा
केली.ऐतिहासिक वास्तूंचे केवळ जतन-संरक्षण एवढेच राज्य सरकारचे उद्दिष्ट नसून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक आणि स्थापत्याचा समृद्ध वारसा सुरक्षितपणे भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येथील प्राचीन चर्च, मंदिरे, किल्ले, पारंपरिक घरे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार आहेत. तसेच स्थापत्य वारसा हा राज्याचा इतिहास, संस्कृती आणि ओळखीचा अविभाज्य भाग आहे. त्याचे जतन संवर्धन करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सरकारनेही व्यापक व दीर्घकालीन धोरण स्वीकारले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकासही आणि वारसाही’ या संकल्पनेचा आधार घेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, आम्ही राज्य, परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर एक सक्षम, पर्यावरणाप्रती जबाबदार आणि ‘स्वयंपूर्ण’ राज्य उभारता येते, हे आम्ही सिद्ध करून दाखवणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेच्या माध्यमातून गोव्याने हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम अशा पायाभूत सुविधा निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्यायोगे शाश्वत विकासाच्या क्रांतीत गोवा देशाचे नेतृत्व करेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
