![]()
नवी मुंबईतील वाशी परिसरातून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाशी संबंधित एका कंत्राटी कर्मचाऱ्याने मराठी दुकानदारासोबत वाद घालत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित कर्मचाऱ्याने दुकानदाराच्या कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य करत धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक वाशी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. या कारवाईदरम्यान एका दुकानदाराचे साहित्य हटवण्यात आले. त्यानंतर संबंधित दुकानदाराने आपले सामान का उचलण्यात आले, कारवाईची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि त्याबाबतचे नियम काय आहेत, अशी विचारणा केली. दुकानदाराकडून कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितले जात असतानाच पथकातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याशी त्याचा वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळला आणि संबंधित कर्मचाऱ्याने दुकानदाराला अत्यंत आक्षेपार्ह तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह धमकी या प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याने दुकानदाराच्या पत्नीचा उल्लेख करत अश्लील आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. सार्वजनिक ठिकाणी, नागरिकांच्या उपस्थितीत अशा प्रकारची भाषा वापरल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. महापालिका कर्मचाऱ्याच्या वर्तनावर सवाल महापालिकेच्या कारवाईदरम्यान एखाद्या नागरिकाने नियम किंवा कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करणे हा त्याचा अधिकार आहे. अशा वेळी संबंधित नागरिकाला नियम समजावून सांगणे अपेक्षित असताना, त्याच्याशी अशा प्रकारे अश्लील भाषेत बोलणे आणि कुटुंबाला धमकी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित व्यक्ती महापालिकेचा नियमित कर्मचारी आहे की कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेला कर्मचारी, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, तो अतिक्रमणविरोधी पथकासोबत कारवाईमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी या घटनेनंतर स्थानिक नागरिक तसेच काही संघटनांकडून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांशी उद्धटपणे वागणाऱ्या आणि कुटुंबाबाबत धमकीवजा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. वाशी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. तसेच महापालिका प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याची ओळख पटवावी, घटनेची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि वाशी पोलिसांकडून अधिकृतपणे काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा… खासदार जाधवांनी मेळावा रद्द केला नाही ही मोठी चूक:आता शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार- मनोज जरांगे पाटी परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी तिथे आलो तर एकनाथ शिंदे यांना माघारी फिरणे अवघड होईल, असा दम जरांगे यांनी दिला आहे.सविस्तर वाचा..
Source link
वाशीत अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिका कर्मचाऱ्याची दादागिरी:मराठी दुकानदाराला अश्लील शिवीगाळ, कुटुंबाला धमकी; व्हिडीओ व्हायरल
