कणकवली/ प्रतिनिधी : ओसरगाव येथील टोल नाक्यावर एमएच०७ पासिंगच्या वाहनांना स्वतंत्र लेनमार्फत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले होते. मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या जाहीर सूचनेत तसा उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र टोल कंपनीने ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या अवाणिज्य वाहनांसाठी आरक्षित लेन असल्याचा फलक प्रदर्शित केल्याने या साऱ्या शंकांवर अखेर पडदा पडला असून पालकमंत्र्यांनी जाहिर केलेल्या रिटर्न गिप्टची वचनपुर्ती केली आहे.
ओसरगाव येथे सुरू होणाऱ्या टोलनाक याबाबत अधिसूचना निघाल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे यांनी २३ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा वासियांसाठी रिटर्न गिफ्ट जाहीर केले होते. त्यानुसार ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या म्हणजेच एमएच ०७ पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या जिल्ह्यातील व्यावसायीक वाहनांसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येणार असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केलेले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून सूचना जाहीर करण्यात आली होती. यात मे. स्कायलार्क इन्फ्रा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ओसरगाव येथील टोलनाक्यावर १७ ऑगस्ट पासून टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यात सिंधुदुर्ग मधील पिवळ्या नंबर प्लेट असणाऱ्या म्हणजेच व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत असल्याचे नमूद केले होते. परंतु सिंधुदुर्ग मधील अवाणिज्य वाहनांना सवलतीबाबत थेट उल्लेख नव्हता. अशा अवाणिज्य वाहनांना मासिक ३५० रुपये शुल्काचा पास देण्यात येणार असल्याचे नमूद होते. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केलेल्या सवलतीबाबत काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र १७ ऑगस्ट पासून टोल वसुली सुरू होऊ शकली नव्हती. काही तांत्रिक कारणांमुळे टोल वसुली पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष टोल सुरू होईल त्यावेळी सिंधुदुर्ग वासियांसाठी स्वतंत्र लेन असणार का याची उत्सुकता लागून राहिली होती.
दरम्यान अद्याप टोल वसुली सुरू झालेली नसली तरीही टोल वसुलीचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने वसूलीच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग मधील अवाणिज्य वाहनांसाठी असलेल्या आरक्षित लेनबाबत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग पासिंगच्या अवाणिज्य वाहनांना या ठिकाणी विनाटोल प्रवास करता येणार आहे. तसेच व्यावसायिक वाहनांनाही ५० टक्के सवलत अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केल्यानुसार सिंधुदुर्ग मधील वाहनांसाठी सवलत स्वतंत्र लेनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असल्याने तसेच व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत जाहीर झालेली असल्याने वाहनचालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
