Shruthi Krishna Life Story: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती कृष्णा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की,ज्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्याला जन्म देणारी खरी आई कोण आहे, हे तिला आजही माहित नाही, असं तिनं सांगितलंय. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे.

वडिलांचं जुळ्या बहिणींशी लग्न
तर श्रुती कृष्णानं नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये तिच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. श्रुतीचे वडील जी. व्ही. कृष्णा हे एका नाटक कंपनीचे मालक होते. या नाटक कंपनीत काम करणाऱ्या त्यांनी दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं होतं. श्रुतीला भावंडही आहेत, त्यांना त्यांची खरी आई कोण, हे मात्र सांगण्यात आलं नाहीये. तिला देखील आजही तिची जन्मदाती सख्खी आई कोण माहिती नाहीये. दोघीही तिला तितकीच माया करता, असंही तिनं सांगितलं.
शोधण्याची किंवा जाणून घेण्याची गरज कधी भासलीच नाही
श्रुती म्हणाली की,मला दोन आई आहे आणि दोघींनीही माझ्यावर सख्ख्या लेकीप्रमाणे भरभरून प्रेम केलं. त्यामुळं आमची खरी आई कोण आहे, हे शोधण्याची किंवा जाणून घेण्याची गरज आम्हाला कधी भासलीच नाही. आमच्या कुटुंबात यावरून कधीच भेदभाव झाला नाही.
बालकलाकार म्हणून सुरुवात , ‘श्रुती’ नावाचा रंजक किस्सा
श्रुतीचं मूळ नाव ‘गिरीजा’ असं होतं. तिचा जन्म रंगभूमी कलावंतांच्या कुटुंबात झाल्यानं लहानपणापासूनच तिला अभिनयाचा वारसा मिळाला. अवघ्या १४ व्या वर्षी तिनं ‘नंबिद्रे नंबी बित्रे बिडी’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यावेळी तिचं स्क्रीन नाव ‘प्रियदर्शिनी’ ठेवण्यात आलं होतं, जे तिला फारसं आवडले नव्हतं.पुढे १९९० मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक द्वारकीश यांच्या ‘श्रुती’ या चित्रपटात काम करत असताना तिनं आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकांच्या सल्ल्यानुसार तिनं चित्रपटाचं नावच स्वतःचं नाव म्हणून स्वीकारलं आणि अशा प्रकारे ‘गिरीजा’ची लोकप्रिय अभिनेत्री ‘श्रुती’ झाली.
सिनेसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’
श्रुतीनं तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि महिलाप्रधान चित्रपट दिले.तिचं २५ वर्षांचं करिअर आहे. चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं भावनिक आणि रडवणाऱ्या भूमिका साकारल्यामुळं तिला कन्नड सिनेसृष्टीत ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला तीन वेळा राज्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. तसंच ती ‘बिग बॉस कन्नड’ची विजेतीही ठरली आहे.
राजकीय करिअर
चित्रपटांसोबतच श्रुती कृष्णानं राजकारणातही आपलं नशीब आजमावलं. ती भारतीय जनता पक्षाची (BJP) सक्रिय सदस्य आहे. तिनं कर्नाटक महिला व बालविकास महामंडळ आणि कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
वैयक्तिक आयुष्यातील वादळ
श्रुती कृष्णाच्या वैयक्तिक आयुष्यात नात्यांच्या बाबतीत मोठे चढ-उतार आले. तिनं पहिलं लग्न दिग्दर्शक एस. महेंद्र यांच्याशी केलं होतं. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी देखील आहे.
दुसरं लग्न अत्यंत नाट्यमय वळणावर संपलं
त्यानंतर, श्रुतीनं चंद्रचूड यांच्याशी दुसरं लग्न केले. मात्र, हे लग्न अत्यंत नाट्यमय वळणावर संपलं. चंद्रचूड यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला अधिकृत घटस्फोट न देताच श्रुतीशी लग्न केलं होतं, अशी माहिती समोर आली. जेव्हा ही बाब समोर आली, तेव्हा श्रुतीनं चंद्रचूड यांच्या पहिल्या पत्नीची बाजू घेत तिचं समर्थन केलं आणि हे दुसरं लग्नही अवघ्या काही काळातच संपुष्टात आलं. दोन वेळा झालेल्या या घटस्फोटांच्या दुःखातून सावरत श्रुतीने स्वतःला खंबीरपणे सांभाळलं.

