Manchester Super Giants Final Win : लॉर्ड्सवर झालेल्या ‘द हंड्रेड २०२६’च्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव केला. पदार्पणातच विजेतेपद मिळवणाऱ्या संघाच्या यशानंतर संजीव गोएंकांची भावूक पोस्ट चर्चेत आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद संजीव गोएंका यांच्या मालकीच्या ‘मँचेस्टर सुपर जायंट्स’ने पटकावले आहे. रविवार, १६ ऑगस्ट रोजी क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत मँचेस्टरचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला होता आणि पदार्पणातच त्यांनी या मानाच्या चषकावर आपले नाव कोरले आहे.
लॉर्ड्सवर झालेल्या या फायनलमध्ये ट्रेंट रॉकेट्सने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मँचेस्टर सुपर जायंट्सने ९८ चेंडूंत ५ गडी गमावून विजय साकारला.
मँचेस्टर सुपर जायंट्सला ‘द हंड्रेड’ २०२६ चे चॅम्पियन बनवण्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज टिम सेफर्ट आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमद यांचे सर्वात मोठे योगदान राहिले. प्रथम गोलंदाजी करताना नूर अहमदने २० चेंडूंत ३३ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेत कमाल केली. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर टिम सेफर्टने १८९.४७ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ३८ चेंडूंत ७ खणखणीत षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची मॅचविनिंग खेळी केली. संघाचा कर्णधार जोस बटलरनेही १४ चेंडूंत २३ धावांचे उपयुक्त योगदान दिले.
संजीव गोएंकांची भावूक पोस्ट
आयपीएलमध्ये संजीव गोएंका यांच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला गेल्या दोन हंगामांत फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती आणि गोएंका अनेकदा निराश दिसले होते. गोएंकांना जो आनंद ऋषभ पंत देऊ शकला नाही, तो आनंद आता इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलरने दिला आहे, अशी चर्चा रंगत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर संघाचे मालक संजीव गोएंका यांच्या आनंदाला पारा उरला नाही. मँचेस्टर सुपर जायंट्सच्या विजयानंतर त्यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा