Headlines

रस्त्यांचे पॅचवर्क सुरू, कामासाठी तब्बल ९९ लाखांचा खर्च;महापालिकेसमोर खर्चाचे आव्हान


Chhatrapati Sambhajinagar: असमान झालेल्या रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा म्हणून महापालिकेने पॅचवर्कची कामे सुरू केली आहेत.पण याचा ९९ लाख इतका होणार आहे.याच सोबत नवीन पाणी योजना, मलनिस्सारण वाहिनी, गॅसवाहिनी टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते, जागांची पुनर्बांधणी संबंधित कंत्राटदारांकडून केली गेली की नाही त्यामुळे कामाचा दर्जा कसा आहे याची तपासणी झाली नाही. त्यामुळे रस्त्यांचा पॅचवर्कचा आर्थिक धोका सहन करावा लागणार आहे. हा खर्च काही कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे.

रस्त्याचे पॅचवर्क सुरू
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणी योजना, मलनिस्सारण वाहिनी, गॅसवाहिनी टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते, जागांची पुनर्बांधणी (रिस्टोरेशन) संबंधित कंत्राटदारांकडून केली गेली की नाही, जिथे काम केले गेले त्याचा दर्जा कसा आहे, याची तपासणी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

आर्थिक बोजा पालिकेला सहन करावा लागणार

त्यामुळे रस्त्यांच्या पॅचवर्कचा मोठा आर्थिक बोजा पालिकेला सहन करावा लागणार आहे. हा काही कोटींपर्यंत असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. त्यामुळे आता पालिका प्रशासनासमोर नवीन आव्हान असणार आहे.

पॅचवर्क पूर्ण झाल्याचा कंत्राटदाराचा दावा

पाणी योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीला जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदल्यानंतर पॅचवर्कचीजबाबदारी निविदेत देण्यात आली होती. त्यातील बहुतांश काम पूर्ण केल्याचा दावा विभागीय आयुक्तांच्या समितीसमोर केल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय मलनिस्सारण (ड्रेनेज) वाहिनी टाकण्यासाठी केलेल्या खोदकामात ६० टक्क्यांपर्यंतचे पॅचवर्क पूर्ण झाल्याचा कंत्राटदाराचा दावा आहे.

र्वरित पॅचवर्क पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागण्याची शक्यता

प्रत्यक्षात ही कामे कितपत पूर्ण झाली याबाबत प्रशासकीय पातळीवर स्पष्टता नाही. गॅस वाहिनीसाठीच्या कामांचाही हिशेब नाही. शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाल्याचा मुद्दा आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पॅचवर्क कामांची पाहणी केली गेली. त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या समितीसमोर सादर केला. त्यात उर्वरित पॅचवर्क पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागण्याची शक्यता व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

ऐनवेळच्या विषयांमध्ये पायाभूत सुविधांचे मुद्दे उपस्थित

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज, मंगळवारी होणार आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे प्रशासकीय सभागृहात अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. विषय पत्रिकेवर एकच विषय असून ऐनवेळच्या विषयांमध्ये पायाभूत सुविधांचे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांचे पॅचवर्क सुरू

पाऊस, काँक्रिटीकरणामुळे असमान झालेल्या रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी महापालिकेने पॅचवर्कची कामे सुरू केली आहेत. ९९ लाखांमध्ये ही कामे करण्यात येणार असून पालिका प्रशासनाने तयार केलेल्या रस्त्यांवरील पॅचवर्क प्राधान्याने केले जाणार आहे. दरम्यान, नवीन योजनेसाठी ‘जीव्हीपीआर’ने जे रस्ते खोदले होते. त्याचे काम मात्र पालिकेकडून केले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून पूर्ण दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: ‘घरकुल योजने’साठी पाच ब्रास वाळू उपलब्ध; मोफत वाळूसाठी ९३२ लाभार्थी पात्र

रस्त्याची पक्की कामे होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पालिकेने काँक्रिटीकरणाचे रस्ते केल्यानंतर अनेक ठिकाणी जोडणी असमान झाली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यांवरील परिस्थितीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची पक्की कामे होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे.

पुढचे काही दिवस शहरवासीयांना दिलासा

मात्र तात्पुरता दिलासा देण्यासाठी पालिकेने पॅचवर्कचे काम हाती घेतले आहे. ९९ लाखांमधून पॅचवर्क होणार आहे. त्यात पालिकेने ३५ स्पॉट निवडले असून प्राधान्याने याठिकाणी जीएसबी पद्धतीने पॅचवर्क केले जाईल. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी शहरवासीयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन पाणी योजनेसाठी जीव्हीपीआरने शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदले.

Maharashtra TimesNashik Murder : पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात

जीव्हीपीआरकडून हे काम झालेले नाही.

नियमानुसार त्यांच्याकडून खोदलेल्या रस्त्याची पुनर्बांधणी (रिस्टोरेशन) होणे अपेक्षित आहे. मात्र जालना रस्त्यासह अनेक भागांत जीव्हीपीआरकडून हे काम झालेले नाही. पालिकेने हाती घेतलेल्या पॅचवर्कमध्ये जीव्हीपीआर खोदलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क केले जाणार नाही. त्यामुळे शहरवासीयांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा