Headlines

यूट्यूब, हेलियम अन् सिलिंडर; हॉटेलच्या खोलीत CAचा शेवट; विचित्र मार्ग निवडला, चिठ्ठीनं गुंता सोडवला { Maharashtra Times


CA Dies: एक तरुण सीए हॉटेलात गेला. चार दिवस उलटले तरीही तो बाहेर आला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दार ठोठावलं. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी खिडकीतून हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला.

ca dies
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हैदराबाद: तरुण सीएनं आयुष्याची दोर कापून घेत इहलोकीचा प्रवास संपवला. ३३ वर्षांच्या सीएनं हॉटेलच्या खोलीत अखेरचा श्वास घेतला. हेलियम वायू हुंगून त्यानं मरण जवळ केलं. तेलंगणाच्या सिद्धिपेट जिल्ह्यात ही घटना घडली. हॉटेलच्या खोलीत चिठ्ठी सापडली आहे. जुगारात झालेल्या नुकसानामुळे आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण सिद्धिपेटचा रहिवासी होता. हैदराबादमधील एका खासगी फर्ममध्ये तो सीए म्हणून कार्यरत होता. तो बऱ्याच कालावधीपासून जुगार खेळत होता. यामुळे त्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. कुटुंबानं त्याला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याची आर्थिक स्थिती सुधारली नाही. हैदराबादमधील फ्लॅट विकण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यानंतरही तो आर्थिक संकटातून बाहेर आला नाही.

तरुणानं जीव देण्यासाठी आधीपासूनच योजना आखली असल्याचं पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितलं. ‘त्यानं हैदराबादच्या बालानगरमधून एक हेलियम वायूचा सिलिंडर आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं खरेदी केली होती. इंटरनेट आणि यूट्यूबवर हेलियम गॅसनं जीव देण्याच्या पद्धतींचे व्हिडीओ पाहिले होते. त्यानं एका मास्कच्या मदतीनं हेलियम गॅस हुंगला आणि हॉटेलच्या खोलीत जीव दिला,’ असा घटनाक्रम पोलिसांनी कथन केला.

हॉटेलमध्ये थांबलेला तरुण बरेच दिवस उलटूनही खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दार ठोठावलं. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर ४ ऑगस्टला हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खिडकीतून खोलीत प्रवेश केला. तेव्हा त्यांना तरुणाचं शव दिसलं. पोलिसांनी खोलीची झडती घेतली. तेव्हा त्यांना एक चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीमुळे तरुणाच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं.

जुगारात सातत्यानं पैसे गमावल्यानं सीए आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला होता. प्रचंड कर्ज आणि आर्थिक नुकसान यामुळे त्यानं आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तरुणाच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. तरुणाच्या अकाली मृत्यूनं कुटुंबाला धक्का बसला आहे.