![]()
मराठवाड्याच्या सुकन्या व गेली 18 वर्षे हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्रात पटकथा व संवाद लेखिका म्हणून नाव कमावलेल्या मर्मबंधा गव्हाणे यांनी आता “ दिल का अलगोरीदम “ या हिंदी वेब सीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन करण्याची उत्तम कामगिरी करून आपली प्रतिभा सिध्द केली आहे. जेन जीचं भावविश्व मांडणारे कथानक व जेन जीचेच नवतरूण अभिनेते असणारी ही 10 भागांची हिंदी वेब सीरीज़ यूट्यूबवर रीलीज केली जात आहे. तीन भाग याआधीच प्रदर्शित झाले असून उर्वरित 7 यापुढे भाग दर गुरूवारी संध्याकाळी साडेसातला प्रदर्शित होणार आहेत. दहा दिवसात दोन लाख प्रेक्षक आजवर अवघ्या दहा दिवसांत दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी याला पाहून पसंती दिल्याने ही ताज्यातवान्या वास्तवदर्शी कथानकाची नव्या दमाची हिंदी वेबसीरीज लोकप्रिय होताना दिसते आहे. दिल का अलगोरीदम “ याची संकल्पना , कथा – पटकथा , संवाद व दिग्दर्शन मर्मबंधा गव्हाणे यांचेच आहे. “फूटरी टेल्स ओरीजीनल “या निर्माता अनुबब चितलांगिया यांच्या कंपनीने ही मालिका तयार केली आहे. याचा आकृतीबंधही “ शॉर्ट ड्रामा”( लघुनाट्य) हा नवा आहे. पहिले तीन प्रसारित झाले आहेत व आजच्या नव्या जेन जी व जेन अल्फाची ही हळूवार पण आगळीवेगळी प्रेमकथा लक्षवेधी ठरते आहे. दोन दशकांचा प्रभावी प्रवास संभाजीनगरच्या मर्मबंधा शुभांगी सुधीर गव्हाणे यांनी मुंबईच्या फिल्म सिटीतील व्हिसलींग वुड्स इंटरनँशनल या प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई यांच्या फिल्म स्कूलमधून दोन वर्षांचा पटकथालेखन व चित्रपट निर्मितीचा विशेष अभ्यासक्रम 2006 ते 2008 मध्ये पूर्ण केला त्यानंतर अनेक हिंदी , मराठी व इंग्रजी चित्रपटाच्या पटकथा व संवाद लिहिले असून पुरस्कारही प्राप्त केले आहेत. टीव्ही अँनिमेशन मालिका “छोटी आनंदी “ , ग्राफिक इंडिया व अमिताभ बच्चन निर्मित “ अँस्ट्रा फोर्स “ या अँनिमेशन मालिकेचेही पटकथा -संवाद लेखन केलेले आहे. “नक्षत्र “ , “ फ्रॉम सिडनी वुईथ लव्ह “ या हिंदी चित्रपटांचे व “वेल डन बेबी”या अँमेझॉन प्राईमवर प्रदर्शित मराठी चित्रपटाची पटकथाकार व सहयोगी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे व आपला ठसा उमटविला आहे. “दिल का अलगोरीदम “ चे पुढील सात भाग हे सप्टेंबर व आक्टोबरमध्ये दर गुरुवारी प्रदर्शित होत आहेत. अमेरिकन सरकारची गौरववृत्ती 2025 मध्ये अमेरिकन सरकारने इंटरनॅशनल व्हिजीटर्स लीडरशिप कार्यक्रम या 1940 पासून कार्यरत प्रतिष्ठित अमेरिका भेटीच्या कार्यक्रमासाठी मर्मबंधा गव्हाणे यांची निवड करून अमेरिकेतील चित्रपट क्षेत्रातील संस्था व नेटफिक्स आदि निर्माता कंपनीशी भेटण्याची संधी देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले होते. यात भारतातील एकूण पाच प्रतिभावान महिला पटकथाकारांची निवड केलेली होती . दिल का अलगोरीदम- तंत्रज्ञान युगाची कथा आता दिल का अलगोरीदम या हिंदी वेब मालिकेच्या कथा-पटकथा लेखिका व प्रथमच दिग्दर्शिका म्हणून मर्मबंधा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकलं आहे. या वेब मालिकेनं तरुणाईला आकर्षित केलेले दिसते आहे व ती हिंदी वेब मालिका व्हायरल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यातील मर्मबंधा गव्हाणे यांच्या दिग्दर्शनाचेही चित्रपट उद्योग क्षेत्रात चांगलेच कौतुक केले जात आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शन
करणा-या या मराठवाड्यातील पहिल्या दिग्दर्शक ठरल्या आहेत.
Source link
मराठवाड्याच्या मर्मबंधा गव्हाणे यांचे दिग्दर्शनात पदार्पण:दिल का अलगोरीदम वेब सीरीझला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
