Headlines

मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे विकासकामांवर चर्चा:अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, राऊतांनाही दिले सडेतोड उत्तर




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेसेनेत (शिवसेना) दाखल झालेल्या 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या 50 मिनिटांच्या मॅरेथॉन बैठकीची इनसाईड स्टोरी सांगितली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर अत्यंत सडेतोड उत्तरे दिली. नुकतेच ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. या प्रवेशानंतर, आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे आणि या 6 खासदारांनी घेतलेली अमित शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याच सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे… विकासकामांवरच चर्चा, मंत्रिमंडळ विस्तारावर नाही: अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ही बैठक केवळ खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर केंद्रित होती. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते आणि पंतप्रधान आवास योजनांसारख्या विविध विकासकामांचे प्रस्ताव आणि पत्रे अमित शहा यांना देण्यात आली. श्रीकांत शिंदेंवर समन्वयाची मोठी जबाबदारी: दिल्लीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी समन्वय कुणाकडे असेल, यावर बोलताना शिंदे म्हणाले की, स्वतः अमित शहा यांनी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. जुने 7 आणि नवीन 6 अशा सर्व 13 खासदारांचे प्रश्न आणि प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसोबत फॉलोअप करण्याचे काम आता डॉ. श्रीकांत शिंदे करतील. संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर ‘चोरीचा माल घेऊन दिल्लीला गेले’ या संजय राऊतांच्या टीकेचा शिंदे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “मी त्यांच्यावर काय बोलणार? आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. पण बाळासाहेबांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली, हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. आम्ही राज्याला वाढवायची भाषा करतो आणि ते तुडवायची भाषा करतात,” असा घणाघात त्यांनी केला. शरद पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही केवळ विकासाच्या कामांसाठी आणि शिष्टाचाराचा भाग होती. यातून लगेच राजकीय अर्थ (NDA मध्ये प्रवेश) काढण्याची गरज नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. “एनडीएमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे,” असेही त्यांनी नमूद केले. ‘रामरक्षा’ आणि ‘डिलिमिटेशन’ वरून टोला ठाकरे गटाच्या ‘रामरक्षा’ आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले, “ज्यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, त्यांना आता रामरक्षा आठवली आहे. ज्यांना स्वतःच्या पक्षाची रक्षा करता आली नाही, ते आता रामरक्षा करत आहेत.” तसेच, आगामी पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक निश्चितपणे मंजूर होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारविरोधी बिलाचे स्वागत पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांचे पद रद्द होण्याच्या संभाव्य बिलाचे शिंदे यांनी स्वागत केले. “पंतप्रधान मोदींचे सरकार स्वच्छ आणि करप्शन फ्री आहे. मोदींचा अजेंडा ‘नेशन फर्स्ट’ आहे, तर विरोधकांचा अजेंडा ‘करप्शन फर्स्ट’ आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली. खासदारांचे कायदेशीर विलीनीकरण हे 6 खासदार 2/3 (टू-थर्ड) बहुमताने शिवसेनेत आल्यामुळे त्यांचे विलीनीकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने लोकसभा अध्यक्षांकडे सर्व कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. आगामी काळात शेतकरी कर्जमाफी आणि ४८ हजार कोटींचे वीज बिल माफ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची वेगाने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. संबंधित बातमी वाचा… शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार!:48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; कर्जमाफीनिमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, लवकरच राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत