Man steals from friend: नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात दुकानदाराच्या जीवलग मित्रानेच विश्वासघात केला. सीसीटीव्ही तपासणीत अनिल शर्मा नावाचा मित्र रोज दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महेश पाटील, नंदुरबार: नवापूर तालुक्यात एका दुकानदाराच्या जीवलग मित्राने त्याचा विश्वास घात केल्याची घटना समोर आली आहे. दुकानातून रोज पैसे चोरी होतात हे लक्षात आल्यावर सीसीटीव्ही मालकाने सीसीटीव्ही तपासले आणि तेव्हा चोर दुसरा-तिसरा कोणीनसून त्यांचा जीवलग मित्रच होता हे समोर आले. या घटनेची फुटेज समोर आली असून, चोरी करताना सरळ दिसून येत आहे.
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितू परदेशी यांच्या मालकीचे खत व बियाणे विक्रीची दुकान असून दुकानाच्या गल्ल्यातून दररोज पैसे चोरीला जात होते. चोराचा शोध घ्यावा म्हणून त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता उघड झाले असून चोर कुणी अनोळखी नसून व्यापाऱ्याचाच जिवलग मित्रच होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
जितू परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. गेल्या काही दिवसांपासून गल्ल्यातील रकमेतील फरक जाणवत असल्याने व्यापाऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांनी फुटेज तपासले असता त्यांना अक्षरशः धक्का बसला. दुकानात नेहमी येणारा त्यांचाच मित्र अनिल शर्मा गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालतो आणि नोटा खिशात टाकतो, हे वारंवार दिसून आले. फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नव्हे; तर दररोजची ‘नियमित’ कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फुटेजमध्ये दिसून येते की अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो, गल्ल्याजवळ आरामात बसतो, व्यापारी इतर कामात गुंग झाला की गल्ल्याकडे हात वळवतो, आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो. अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे.
सध्या हा चोरीचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणात जितू सुरेश परदेशी (रा. खांडबारा) यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा (रा. खांडबारा) यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा