Headlines

अधमाचा झटपट न्याय| Maharashtra Times


नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला अवघ्या दोन महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावली जाणे, हे न्यायव्यवस्थेतील तत्परतेचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे. वेगवान तपास, ठोस पुरावे आणि विलंब टाळणारी सुनावणी यामुळे न्यायावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

अधमाचा झटपट न्याय
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे जिल्ह्यातील नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीविना अन्य कोणतीही शिक्षा अपुरीच ठरली असती. विशेष न्यायालयाने सोमवारी त्याला देहदंड सुनावलाच; मात्र गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तपास आणि दोन महिन्यांत न्यायालयातील सुनावणी पार पाडलेली वेगवान प्रक्रिया पाहता, न्यायसंस्था, वकील आणि पोलिस यंत्रणाही अभिनंदनास पात्र आहेत. हा अमानुष गुन्हा करणाऱ्या भीमराव कांबळे या ६५ वर्षांच्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याने त्या चिमुरडीचा जीव परत येणार नाही; मात्र तपास आणि न्याययंत्रणेतील विलंबामुळे मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांना जरब आणि सर्वसामान्यांच्या मनांत न्यायव्यवस्थेविषयीचा विश्वास दृढ करणारी ही घटना म्हणावी लागेल. अशा सूत्रबद्ध पद्धतीने तपास आणि साक्षी-पुराव्यांची प्रभावी बांधणी-मांडणी करून असे खटले वेगाने निकाली काढणे, हा अपवाद न राहता तीच यंत्रणांची कार्यसंस्कृती बनली, तर कायद्याच्या राज्याकडे वाटचाल सुरू झाली, असे नक्की म्हणता येईल. अर्थात, या शिक्षेविरोधात उच्च-सर्वोच्च न्यायालयातील अपील आणि दयेचा अर्ज अशी प्रक्रिया अजून बाकी असल्याने या शिक्षेची अंमलबजावणी होणे अद्याप बाकी आहे; ती प्रक्रियासुद्धा वेगाने पार पडेल, तेव्हाच ‘ न्याय झाला,’ असे म्हणता येऊ शकेल.

ही पुण्यातली मुलगी एक मे रोजी दुपारी अंगणात खेळत होती. तेव्हा आरोपीने तिला फसवून एका गोठ्यात नेले आणि अत्याचार करून तिचा खून केला. या निर्घृण कृत्यामुळे सरकारला प्रचंड जनआक्रोशाला तोंड द्यावे लागले. संतापलेल्या नागरिकांनी बंदही पाळला आणि महामार्गसुद्धा रोखून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर काही तासांमध्ये आरोपीला पकडण्यात आले आणि विशेष तपास पथकाची स्थापनाही करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने तांत्रिक पुराव्यांवर आधारित तपास झाला. एरव्ही काही महिने लागणारा न्यायवैद्यक अहवाल दोन दिवसांतच सादर झाला; जनक्षोभ उसळल्याने आरोपीला प्रत्यक्ष जागेवर नेता आले नाही. त्यामुळे ‘व्हर्च्युअल’ पंचनामा करण्याचा नवा मार्ग यंत्रणांना दिसून आला आहे. पोलिसांनी पंधरा दिवसांतच बाराशे पानांचे आरोपपत्र सादर केले. पुढे न्यायालयात ५५ साक्षीदारांची तपासणी-उलट तपासणी अशी प्रक्रिया पार पाडून दोन महिन्यांत विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या संपूर्ण सुनावणीदरम्यान सरकार किंवा आरोपीच्या वकिलांनी वेळ मागून घेतला नाही आणि एकदाही पुढील तारीख देण्यात आली नाही, हे या खटल्याचे वैशिष्ट्य. परिस्थितीजन्य पुरावे, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे अशा खटल्यांमध्ये किती महत्त्वाचे ठरतात, याचीही प्रचिती या निमित्ताने आली.

आरोपीचा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ असल्याचे सिद्ध करण्यात सरकारपक्षाला यश आले; त्याप्रमाणेच तपास यंत्रणा व न्यायसंस्थेने दाखवलेली तत्परता ‘दुर्मीळ’ ठरू नये, एवढी अपेक्षा चुकीची ठरणार नाही. या अमानवी कृत्याच्या विरोधातील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले कडक आदेश आणि जिल्हा पोलिस प्रमुख संदीपसिंग गिल यांनी ठेवलेली देखरेख यांमुळे वेगाने प्रक्रिया पार पडली. मात्र, प्रत्येक प्रकरणात असे का घडत नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न चुकीचा नाही. अनेक गुन्ह्यांमध्ये तपासात विलंब-ढिलाई घडते; साक्षीदारांकडून आणि कागदपत्रांद्वारे विश्वासार्ह माहिती मिळवून परिणामकारक मांडणी होत नाही. न्यायालयांमध्येही मोठा विलंब होतो. त्यामुळेच ‘न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार,’ याचा अनुभव येतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी विविध पातळ्यांवर सुधारणा करणे आवश्यक आहे. राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, ग्रामीण भागांत तर हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो. वाहने आणि साधनांची कमतरता त्यांना नेहमीच भेडसावते. न्यायवैद्यक प्रयोगशाळा मोजक्या संख्येनेच असून त्यांच्यावर प्रचंड ताण असल्याने तेथून अहवाल मिळण्यास मोठा विलंब होतो. न्यायालयांत किरकोळ कारणांसाठी पुढील तारखा मागून घेतल्या जातात; तसेच न्यायाधीशांची संख्या, न्यायालयांच्या इमारतींपासून पायाभूत सुविधा असे प्रश्न कायम आहेत. त्यातून होणाऱ्या विलंबामुळेच नागरिकांचा न्याययंत्रणेवरील विश्वास उडत असल्याचे दिसते. त्यातूनच ‘पोलिस एनकाउंटर’ करून झटपट न्यायाची सवय वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला ठार करण्यात आले; तसेच या प्रकरणातही संतप्त नागरिक ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या,’ अशी मागणी करताना दिसून आले. मात्र, तो आभासी न्याय आहे; कायद्याने सर्व प्रक्रिया पार पाडून न्यायालयातून मिळणारा न्याय, हाच न्यायाचा खरा आणि शाश्वत मार्ग आहे. त्यासाठी विशेष न्यायालये-न्यायाधीशांची संख्या वाढवणे, न्यायवैद्यक प्रयोगशाळांची पुरेशी व्यवस्था आणि पोलिसांपासून ते न्यायव्यवस्थेपर्यंत पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असे दीर्घकालीन उपाय केले, तरच अशा अनेक बालक-बालिकांना न्याय मिळेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा