Europe Jobs Reality: पॅरिसमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणाने सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक जीवनशैलीच्या आहारी न जाता वास्तव समजून परदेशात जाण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं काय म्हणाला हा तरुण?
हा व्हिडीओ lohan.enroute या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये राहणाऱ्या या भारतीय तरुणाचं नाव तनिष्क लोहान आहे. त्यानं विदेशात जाऊन करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
तो म्हणतो, “भारताबाहेर पडल्याशिवाय जग कसं आहे, हे कळणार नाही, हे खरं आहे. पण सोशल मीडियावर दिसणारी आकर्षक जीवनशैली पाहून युरोप किंवा अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेऊ नका. कारण स्वतःच्या देशाबाहेर राहणं सोपं नाही. सर्वप्रथम तुम्हाला तिथली भाषा शिकावी लागते. त्यानंतर तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावं लागतं आणि पूर्णपणे आत्मनिर्भर बनावं लागतं. खाण्यापासून कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामं स्वतःलाच करावी लागतात.”
तो पुढे म्हणतो, “परदेशात गेल्यानंतर लगेच नोकरी मिळेल, याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे संयम ठेवावा लागतो. कारण तिथेही नकाराचा सामना करावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपलं कुटुंब, मित्र-मैत्रिणी, संस्कृती आणि आपलं आयुष्य मागे सोडून पूर्णपणे नव्या वातावरणात आणि नव्या संस्कृतीत एकट्यानं संघर्ष करावा लागतो. या संघर्षात यश मिळेलच, याचीही खात्री नसते. त्यामुळे अपयश आलं, तर त्याची किंमत कुटुंबीयांनाही मोजावी लागते. कारण बहुतांश लोक कर्ज काढूनच विदेशात जातात.”
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
हा व्हिडीओ १८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत वास्तव मांडल्याबद्दल तनिष्कचं कौतुक केलं आहे. यापूर्वीही अनेकांनी अशाच प्रकारचे व्हिडीओ शेअर करत परदेशात काम करताना आलेले चांगले आणि वाईट अनुभव मांडले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या मनात कोणते विचार आले? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

