Headlines

भगवंताच्या नामाच्या एकनिष्ठतेच खरी तृप्ती:यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन रंगले, दगडूशेठ ट्रस्टतर्फे आयोजन




भगवंताच्या नामात एकनिष्ठतेने स्थिर होण्यातच खरी तृप्ती प्राप्त होते, असे प्रतिपादन यशोधन महाराज साखरे यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित चातुर्मास कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ९ ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सुरू असून, दररोज सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. या माध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेता येणार आहे. महाराज साखरे यांनी सांगितले की, भौतिक किंवा व्यावहारिक पदार्थांच्या माध्यमातून तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास ती तात्पुरती असते. व्यावहारिक आणि भौतिक पदार्थांच्या मागे लागून खरी तृप्ती प्राप्त होत नाही. भौतिक वस्तूंमधून तृप्ती मिळवणे हे मूर्खपणाचे लक्षण असून, जरी ती मिळाली तरी ती तात्कालिकच असते. जगात एकमेव शब्दप्रभू म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शब्दप्रभू म्हणजे ज्याच्याकडे शब्द निर्माण करण्याचे आणि त्या शब्दाला अर्थ देण्याचे सामर्थ्य आहे. माऊलींच्या शब्दकलेचे वैभव असे आहे की, त्या ठिकाणी अर्थ निर्माण होतो आणि तो अर्थच माझ्यासाठी शब्द कधी निर्माण होईल याची वाट पाहत असतो, असे माऊलींच्या शब्दांचे सामर्थ्य त्यांनी स्पष्ट केले. या कीर्तन महोत्सवाला प्रवेश खुला असून, पुणेकरांनी या कीर्तनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत