![]()
पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. बिबवेवाडी, लोणी काळभोर आणि वडगाव शेरी या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी येथील चंद्रलोक चौकात सोमवारी (13 जुलै) सकाळी भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार मुकुंद अनंत तबीब (वय 76, रा. कांचनगंगा सोसायटी, बिबवेवाडी) यांचा मृत्यू झाला. तबीब हे नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तबीब यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजेंद्र श्रीपाद साताळकर (वय 64) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण नारायण होमकर (वय 78, रा. श्री दत्तपार्क सोसायटी, लोणी काळभोर) यांचा मृत्यू झाला. होमकर हे दूध आणण्यासाठी पुणे-सोलापूर रस्त्यावरून जात असताना कुंजीरवाडी परिसरात रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या होमकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्नेहल गणेश व्हावळ (वय 43) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे पुढील तपास करत आहेत. वडगाव शेरी भागात भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार निकोलस व्हॅन विल्सन (वय 35, रा. इम्पेरिअल टॉवर, महंमदवाडी रस्ता, उंड्री) यांचा मृत्यू झाला. ही घटना 26 जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. निकोलस वडगाव शेरीतील न्याती मेडोज सोसायटीसमोरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निकोलस यांची आई शेरलीन (वय 60) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात 24 तासांत तीन भीषण अपघात:बिबवेवाडी, लोणी काळभोर अन् वडगाव शेरीत तिघांचा मृत्यू
