Headlines

पाकिस्तान जवळपास आऊट, पण भारत अजूनही WTCची फायनल गाठू शकतो, नेमकं कसं? वाचा संपूर्ण समीकरण


WTC 2025-27 Points Table : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचू शकतो? उर्वरित ९ कसोटी सामने, गुणतालिका आणि संपूर्ण समीकरण कसे असणार? जाणून घ्या.

WTC 2025-27 Points Table
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2025-27 ) गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. तरीही अंतिम फेरी गाठण्याची आशा अद्याप संपलेली नाही. उर्वरित नऊ कसोटी सामने भारताचे भवितव्य ठरवणार आहेत.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अव्वल दोन स्थानांवर आहेत. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर त्यांची स्थिती आणखी कठीण झाली असून ते आठव्या स्थानावर आहेत. भारताचे गुणांचे प्रमाण ४८.१५ टक्के आहे. त्यामुळे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता जवळपास प्रत्येक मालिकेत दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

Maharashtra TimesShubman Gill : श्रीलंका कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली, सराव करताना शुभमनला दोनदा दुखापत; वॉर्म-अप सामना खेळणार की नाही?

भारताचे उर्वरित ९ कसोटी सामने

भारताचा श्रीलंका दौरा (२ कसोटी), त्यानंतर न्यूझीलंड दौरा (२ कसोटी) आणि २०२७ च्या सुरुवातीला भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हेच नऊ सामने भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत.

भारताने सर्व ९ सामने जिंकले तर सर्व गुणांचे प्रमाण ७४ टक्क्यांहून अधिक होईल आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आठ विजय मिळाल्यासही फायनलची संधी मजबूत राहू शकते. मात्र सात विजयांवर समीकरण इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहील.

Maharashtra TimesVirat Kohli : विराटची ‘वृंदावन’ भक्ती, अनुष्कामुळे कोहली बदलला? विरुष्काच्या श्रद्धेवर प्रश्न, मोहम्मद शमीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, काय म्हणाला?

कोणत्या मालिकांवर असेल सर्वाधिक लक्ष?

श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकणे भारतासाठी जवळपास अनिवार्य मानले जात आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध किमान एक किंवा शक्य असल्यास दोन्ही सामने जिंकावे लागतील. सर्वात मोठी परीक्षा मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत असेल. या मालिकेत भारताला स्पष्ट वर्चस्व गाजवावे लागेल. कारण ऑस्ट्रेलियाला मागे टाकल्याशिवाय फायनलचा मार्ग सोपा होणार नाही.

सध्या पाहता भारताचे अंतिम फेरीचे स्वप्न जिवंत आहे. मात्र आता चुका करण्यासाठी फारशी संधी उरलेली नाही. उर्वरित प्रत्येक कसोटी सामना भारतासाठी ‘करो या मरो’सारखाच महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने सातत्यपूर्ण विजयांची मालिका कायम ठेवली, तर डब्ल्यूटीसीफायनलचे समीकरण पूर्णपणे संघाच्या बाजूने फिरू शकते.