Headlines

पश्चिम रेल्वेवर प्रवास होणार सुखकर! चर्चगेट-डहाणू लवकरच धावणार 15 डब्यांची लोकल; स्थानकांवर काम अंतिम टप्प्यात| Maharashtra Times


Western Railway: पश्चिम रेल्वेवर सध्या 15 डब्यांच्या लोकलच्या विस्तारचं काम सुरू आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यान रेल्वे स्थानकांवर फलाटांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सध्या स्थानकांवर कॉमन स्टॉप मार्क तयार करण्यात येत आहे.

western railway
म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बारा डब्यांची लोकल सेवा सुरू झाली होती. सध्या विरार-चर्चगेटदरम्यान १५ डब्यांच्या लोकल धावत असून आता डहाणू ते चर्चगेट १५ डब्यांची सेवा सुरू करण्यासाठी स्थानकांवर आवश्यक बदल युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ‘कॉमन स्टॉप मार्क’ तसेच प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोणत्या स्थानकांवर कामं सुरू?

पश्चिम रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागामार्फत सफाळा, केळवा रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकांवर १५ डब्यांच्या गाड्या नेमक्या कुठे थांबतील यासाठी ‘कॉमन स्टॉप मार्क’ बसवण्याचे काम सुरू आहे. सफाळा स्थानकात फलाट क्रमांक १ वर सध्याच्या १२ डब्यांच्या थांब्यापासून उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर, तर फलाट क्रमांक २ वर विद्यमान मार्किंगपासून सुमारे १५ मीटर अंतरावर नवीन मार्क उभारले जात आहेत. केळवा रोड स्थानकातही फलाट क्रमांक १ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर हे काम सुरू आहे.

Maharashtra TimesMumbai Local : सुट्टीच्या दिवशीच मुंबई लोकलचा खोळंबा; तासभरानंतरही ट्रेन निघत नसल्याने प्रवाशांचा ट्रॅकवरुन मार्ग, नेमकं काय घडलं?

पालघर स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर १५ डब्यांच्या लोकलसाठी मार्क उभारले जात आहेत. उमरोळी स्थानकात फलाट क्रमांक १ च्या उत्तर टोकाकडे, तर बोईसर स्थानकात फलाट क्रमांक १ वर सुमारे ४० मीटर अंतरावर हे काम अंतिम टप्प्यात आहे. वाणगाव स्थानकात फलाट क्रमांक २ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर मार्किंग सुरू आहे.

डहाणू रोड स्थानकावरही काम सुरू

डहाणू रोड स्थानकात फलाट क्रमांक २ च्या डाउन दिशेला तसेच फलाट क्रमांक ३ वर नवीन कॉमन स्टॉप मार्क उभारण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामांनंतर प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शकही बसवले जाणार आहेत. फलाटांवर प्रवाशांना पदपुलांचा उपयोग सोयीस्कर होईल, याचा विचार करूनच स्टॉप मार्क निश्चित केले जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. यासंदर्भात सर्व स्थानक अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesMumbai Local: आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लोकल; CSMT-कल्याण, पनवेल मार्गावर मध्यरात्री अतिरिक्त फेऱ्या; कसं असेल वेळापत्रक?

दरम्यान, १० ते ११ एप्रिलदरम्यान हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र १२ एप्रिलपर्यंतही काम पूर्ण झाले नसल्याने डहाणू-चर्चगेट १५ डब्यांची सेवा सुरू होण्यास किमान आठवडाभर विलंब होण्याची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा