Headlines

न लाटता बनवा एकदम सोप्पी पद्धत पुरणपोळी, पुरण न वाटता झटपट बनवा पुरणपोळ्या – how to make puran poli recipe maharashtrian pooran poli tips


Lay Bhari Vlogs यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुरणपोळीची ही सोपी रेसिपी शेअर केली आहे. या पद्धतीत पुरण वाटण्यासाठी पुरणयंत्राची गरज नसून, पोळी लाटण्याचीही आवश्यकता नाही.हातानेच पुरण पसरवून मऊ, पातळ आणि छान फुगणाऱ्या पुरणपोळ्या सहज तयार करता येतात.

Maharashtrian Puran Poli
फोटो सौजन्य :- @Lay Bhari Vlogs
पुरणपोळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती तुपाची धार सोडलेली, मऊ, लुसलुशीत आणि गोडसर पुरणाने भरलेली पोळी. महाराष्ट्रातील सण-समारंभांमध्ये, विशेषतः होळी आणि इतर शुभ प्रसंगी पुरणपोळीला खास महत्त्व आहे. मात्र अनेकांना पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना पुरण बाहेर येणे, पोळी फाटणे किंवा ती तव्यावर नीट न फुगणे अशा अडचणी येतात. यासाठी पुरणपोळी बनवण्याची एकदम सोपी पद्धत वापरता येते. या पद्धतीत पुरण वाटण्यासाठी पारंपरिक पुरणयंत्राची गरज नाही आणि पोळी लाटण्याचीही आवश्यकता नाही. हातानेच पुरण पसरवून छान पातळ पोळी तयार करता येते.

ही सोपी आणि उपयोगी पुरणपोळीची पद्धत Lay Bhari Vlogs यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमधून समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये पुरणपोळी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्यात आली असून, पहिल्यांदाच पुरणपोळी करणाऱ्यांसाठीही ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. चला तर मग, या रेसिपीची पद्धत आणि त्यातील महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- @Lay Bhari Vlogs)

पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य

पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य
  • पिठासाठी
  • २ वाट्या मैदा
  • १ वाटी बारीक गव्हाचे पीठ
  • अर्धा चमचा मीठ
  • पाव चमचा हळद
  • २ ते ३ चमचे तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • पुरणासाठी
  • २५० ग्रॅम चणाडाळ
  • २५० ग्रॅम गूळ
  • अर्धा चमचा सुंठ पावडर
  • अर्धे जायफळ किसलेले
  • थोडे मीठ
  • पाव चमचा हळद

पुरण बनवण्याची सोपी पद्धत

पुरण बनवण्याची सोपी पद्धत

पुरणासाठी साधारण २५० ग्रॅम चणाडाळ आणि २५० ग्रॅम गूळ घ्यावा. चणाडाळ दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन काही वेळ भिजत ठेवावी. डाळ भिजवल्यामुळे ती लवकर शिजते.भिजवलेली डाळ कुकरमध्ये घालून आवश्यक ते पाणी, थोडे मीठ, पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालावे. तेल घातल्यामुळे डाळ शिजताना उतू जाण्याची शक्यता कमी होते. डाळ चांगली मऊ होईपर्यंत कुकरमध्ये शिजवावी.डाळ शिजल्यानंतर तिचे अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून घ्यावे.

हे पाणी फेकून देऊ नका. त्यापासून पुढे चविष्ट कटाची आमटी बनवता येते.आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणयंत्राची गरज नाही. डाळ गरम असतानाच ती कढईत घ्यावी आणि पावभाजी मॅशरच्या मदतीने चांगली मॅश करावी. गरम डाळ पटकन मऊ होते. डाळीत गुठळ्या किंवा कण राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.डाळ बारीक झाल्यावर त्यात समान प्रमाणात गूळ घालावा. कढई मंद आचेवर ठेवून हे मिश्रण सतत ढवळत राहावे. सुरुवातीला गूळ वितळल्यामुळे पुरण पातळ दिसेल; त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मिश्रण शिजत गेल्यावर ते हळूहळू घट्ट होते.

पुरण तयार झाले आहे हे कसे ओळखावे?

पुरण तयार झाले आहे हे कसे ओळखावे?

पुरण कढईच्या कडांपासून सुटू लागले आणि चमचा उभा करून ठेवला असता तो सहज पडत नसेल, तर पुरण तयार झाले असे समजावे. मात्र पुरण खूप कोरडे करू नये. पोळी बनवताना मऊ पुरण असल्यास ते सहज पसरते आणि पोळी फाटण्याची शक्यता कमी होते.गॅस बंद केल्यानंतर पुरणात अर्धा चमचा सुंठ पावडर आणि किसलेले जायफळ घालावे. यामुळे पुरणपोळीला सुंदर सुगंध आणि चव येते.पुरण थंड झाल्यावर त्याचे समान आकाराचे गोळे करून ठेवावेत.

पुरणपोळी रेसिपी

न लाटता पुरणपोळी कशी बनवायची?

न लाटता पुरणपोळी कशी बनवायची?

ही या रेसिपीची सर्वात सोपी आणि खास पद्धत आहे.मळलेली कणीक पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यावी. त्याचा एक गोळा घ्यावा आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरावा. कणकेच्या कडा एकत्र करून पुरण पूर्णपणे बंद करावे.आता हाताला थोडे तेल लावून हा गोळा हलक्या हाताने दाबत गोल फिरवावा. पुरण सगळीकडे समान पसरवावे. यासाठी लाटणी वापरण्याची अजिबात गरज नाही.

एका स्वच्छ प्लास्टिक शीटवर किंवा स्वयंपाकासाठी योग्य नॉन-स्टिक शीटवर थोडे तेल लावावे. त्यावर भरलेला गोळा ठेवून हातानेच हळूहळू गोल फिरवत पातळ करावा. ही पद्धत विशेषतः ज्यांना लाटणीने पुरणपोळी लाटताना अडचण येते त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे.पोळी शक्य तितकी समान जाडीची आणि पातळ करावी.

कटाची आमटीही बनवा

कटाची आमटीही बनवा

डाळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी वापरून कटाची आमटी बनवता येते. फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट वापरावी. त्यात थोडा मसाला, धणेपूड आणि गरजेनुसार गरम मसाला घालावा. डाळीचे पाणी टाकून त्याला उकळी आणावी. चवीसाठी चिंचेचे पाणी आणि आवश्यकतेनुसार मीठ घालावे. अशा प्रकारे पुरणपोळीबरोबर तिखट-आंबट आणि मसालेदार कटाची आमटी तयार होते.

पुरणपोळी भाजण्याची योग्य पद्धत

पुरणपोळी भाजण्याची योग्य पद्धत

तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यावर थोडे तूप लावावे. तयार केलेली पुरणपोळी शीटवरून अलगद तव्यावर ठेवावी आणि शीट सावधपणे काढावी.गॅस खूप मंद किंवा खूप मोठा ठेवू नये. मध्यम आच ही पुरणपोळी भाजण्यासाठी योग्य आहे. एका बाजूने शेकल्यावर पोळी अलगद पलटावी. दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतल्यानंतर त्यावर भरपूर तूप लावावे.योग्य कणीक आणि योग्य पुरण असेल तर पुरणपोळी छान फुगते. गरमागरम पुरणपोळीवर तूप सोडून ती दूध, तूप किंवा कटाची आमटीसोबत सर्व्ह करता येते.

मऊ पुरणपोळीसाठी महत्त्वाच्या टिप्स

मऊ पुरणपोळीसाठी महत्त्वाच्या टिप्स
  • चणाडाळ चांगल्या गुणवत्तेची वापरा. जुनी डाळ नीट शिजली नाही तर पुरणात कण राहू शकतात आणि पोळी फाटू शकते.
  • डाळ भिजवून घ्या. त्यामुळे डाळ लवकर आणि व्यवस्थित शिजते.
  • कणीक अतिशय मऊ मळा. यामुळे पोळी सहज पसरते.
  • कणकेला विश्रांती द्या. साधारण एक तास झाकून ठेवल्यास कणीक अधिक मऊ होते.
  • डाळ गरम असतानाच मॅश करा. त्यामुळे पुरण पटकन बारीक होते.
  • पुरणात कण राहिले असतील तर ते मिक्सरमध्ये थोडे फिरवून घ्यावे किंवा पुरणयंत्राचा वापर करावा.
  • पुरण खूप घट्ट करू नका. मऊ पुरणामुळे पोळी बनवणे सोपे होते.
  • पोळी लाटण्याऐवजी हाताने पसरवताना हळूहळू आणि हलक्या हाताने काम करा.
  • तवा मध्यम गरम असावा. खूप गरम तव्यामुळे पोळी पटकन भाजून कडक होऊ शकते.तयार पुरणपोळीवर गरमागरम तूप जरूर घाला.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा