Headlines

नेपाळमध्ये अडकलेले अमरावतीचे 4 तरुण सुखरूप:दोन दिवसांनी संपर्क, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन




नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये अमरावती येथील निवासी श्याम मारोडकर आणि त्याच्या चार मित्रांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. श्यामचे काका गौरव मारोडकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात पोहोचून हे सर्वजण सुखरूप असल्याची पुष्टी केली. गौरव मारोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम आणि त्याचे इतर तीन मित्र नेपाळमध्ये फिरायला गेले होते. प्रवासात त्यांना आणखी काही महाराष्ट्रीयन तरुण भेटले. दोन दिवसांपूर्वी श्यामशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती, विशेषतः नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ही चिंता अधिकच गडद झाली. वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर संपर्क साधला गेला आणि ते सर्वजण परतीच्या प्रवासाला लागल्याचे कळले. यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला. श्याम आणि त्याच्या मित्रांचे वय साधारणतः ३० वर्षे असून ते सध्या मायदेशी परतत आहेत. गौरव मारोडकर यांनी शासनातर्फे त्यांना परतीच्या प्रवासासाठी काही मदत लागल्यास ती पुरवली जावी, अशी विनंती केली. प्रशासनाने या प्रवासात सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मदत कक्षात मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील कक्कड कुटुंबातील एक महिला देखील पर्यटनासाठी नेपाळला गेल्या होत्या. मात्र, त्या दोन दिवसांपूर्वीच नेपाळमधून बाहेर पडून दुसऱ्या देशात गेल्या आहेत. नेपाळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टूर पॅकेजर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत कोणी नेपाळला गेले आहे का, याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत केवळ एकच तक्रार प्राप्त झाली आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, मदतीची आवश्यकता असलेल्यांनी राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन- १०७० (टोल-फ्री), नियंत्रण कक्ष +९१-९३२१५८७१४३ किंवा controlroom@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत