सीबीआयच्या आरोपपत्रात महत्वाचे खुलासे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मे मध्ये घडलेल्या ‘नीट-युजी’ प्रश्नपत्रिकाफुटीसंबंधी महत्वाचा गौप्यस्फोट सीबीआयकडून करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका एनटीएने नियुक्त केलेल्या तज्ञांनीच फोडली आहे, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. या तज्ञांनी प्रश्नपत्रिकेची रचना केली. नंतर त्या प्रश्नांच्या चिठ्ठ्या तयार केल्या. तसेच अनेक प्रश्न लक्षात ठेवले आणि नंतर ते फोडले, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
यापूर्वी ज्या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या, त्या एकतर परीक्षा केंद्रांमधून फुटल्या होत्या किंवा प्रश्नपत्रिकांची वाहतूक होत असताना त्या फोडण्यात आल्या होत्या. मात्र, मे 2026 मध्ये झालेले प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकरण, प्रश्नपत्रिकेची रचना जेथे केली जाते, तेथेच घडले आहे, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
तीन प्रमुख आरोपी
या प्रकरणात तीन प्रमुख आरोपी आहेत. हे तीन्ही प्राध्यापक असून प्रश्नपत्रिकेची रचना करणारे तज्ञ मानले जातात. पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा मांढरे (वनस्पतीशास्त्र) आणि मनीषा हवालदार (भौतिक शास्त्र) अशी त्यांची नावे आहेत. यांनी प्रश्नपत्रिकेची अंतिम रचना केली होती. त्यांनीच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न फोडले आणि त्यांची विक्री केली. एनटीएची व्यवस्थाही या प्रकरणाला कारणीभूत आहे. हे तज्ञ प्रश्नपत्रिका बनवून बाहेर पडताना त्यांची तपासणी करण्यात आली नाही. ती केली असती, तर घोटाळा त्याच वेळी बाहेर पडला असता. तथापि, तेथे गलथानपणा करण्यात आल्याने या तज्ञांना त्यांचे कारस्थान पार पाडण्याची संधी मिळाली, असे आरोपपत्रात नमूद केले गेले आहे.
प्रश्नांची विक्री
प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर बाहेर प्रश्नांची विक्री करण्यात आली. हे काम एका रॅकेटच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी सोशल मिडियाचा उपयोग करण्यात आला. एनटीएकडे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे असलेली खोली नव्हती. हे एक कारणही प्रश्नपत्रिका फुटीसाठी महत्वाचे ठरले आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे. आता हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालणार असून त्यामुळे लवकरात लवकर न्यायालयीन कारवाई होणार आहे.
