Headlines

नर्व्हस नाईन्टीज नाही, राहुलचं ‘नर्व्हस एटीज’! 82वर पुन्हा शतक हुकलं, सातव्यांदा 80-90च्या आसपास अडकला


KL Rahul Test Career : गॉल कसोटीत केएल राहुल ८२ धावांवर बाद झाला असून त्याचे शतक थोडक्यात हुकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ८० ते ९० धावांच्या दरम्यान बाद होण्याची राहुलची ही तब्बल सातवी वेळ ठरली आहे.

KL Rahul 7th Time Dismissed Between 80 90 Runs
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एखादा फलंदाज ९० च्या घरात पोहोचला की अनेकदा दडपणाखाली आपली विकेट गमावतो, ज्याला क्रिकेटच्या भाषेत ‘नर्व्हस नाईन्टीज’ म्हटले जाते. मात्र, भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलच्या बाबतीत हा किस्सा थोडा वेगळा आहे. राहुल ‘नर्व्हस नाईन्टीज’चा नव्हे, तर ‘नर्व्हस एटीज’चा शिकार होतो. श्रीलंका विरुद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात राहुल पुन्हा एकदा ८० ते ९० धावांच्या फेऱ्यात अडकून बाद झाला आणि त्याचे एक निश्चित वाटणारे शतक हुकले.

गॉल कसोटीत केएल राहुल ने १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, श्रीलंकेचा नवोदित गोलंदाज केशाना नुवंथाने त्याला बाद केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केएल राहुल ८० ते ९० धावांच्या दरम्यान बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही तब्बल ७ वी वेळ ठरली आहे.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test Day 2 : दीड सत्र पाऊस, नुवंथानं दिले दोन धक्के, पडिक्कलचं द्विशतक हुकलं; तरी भारताचा धुमाकूळ, ४६०चा डोंगर

पहिल्या दिवशी स्नायूंच्या ताणामुळे होता त्रस्त

१५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी राहुल अत्यंत चांगल्या लयीत खेळत होता. मात्र, क्रॅम्प्समुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे तो ७७ धावांवर असताना ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, दुसऱ्यांदा फलंदाजीला आल्यावर त्याला आपल्या धावसंख्येत केवळ ५ धावांची भर घालता आली. अशा प्रकारे त्याचे आणखी एक कसोटी शतक थोडक्यात हुकले. बाद होण्यापूर्वी त्याने युवा फलंदाज देवदत्तपडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची (२७३ चेंडू) महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

केएल राहुल कधी-कधी ठरला ‘नर्व्हस एटीज’चा शिकार?

  1. ९० धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बेंगळुरू, २०१७)
  2. ८५ धावा – विरुद्ध श्रीलंका (पल्लेकेले, २०१७)
  3. ८४ धावा – विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम, २०२१)
  4. ८६ धावा – विरुद्ध इंग्लंड (हैदराबाद, २०२४)
  5. ८४ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ब्रिस्बेन, २०२४)
  6. ९० धावा – विरुद्ध इंग्लंड (मँचेस्टर, २०२५)
  7. ८२ धावा – विरुद्ध श्रीलंका (गॉल, २०२६)

Maharashtra TimesConcussion Test : राहुलचा शॉट थेट हेल्मेटवर, तपासणीनंतर मदुष्का बाहेर; फिजिओ ‘कन्कशन टेस्ट’ नेमकी कशी करतात? अज्जूने सगळं सांगितलं

केएल राहुलची कसोटी कारकीर्द

केएल राहुलच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने एकूण ६९ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १२० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३६.८३ च्या सरासरीने ४२३५ धावा कुटल्या आहेत. या प्रवासात त्याच्या बॅटमधून १२ शतके आणि २१ अर्धशतके झळकली आहेत. राहुलने डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीचे पदार्पण केले होते.