Headlines

देशप्रेमाला कायद्याचे कवच| Maharashtra Times


‘वंदे मातरम’च्या गायनात जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडले असून, त्यावर संसदेत राजकीय आणि घटनात्मक चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

देशप्रेमाला कायद्याचे कवच
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळे आणणे किंवा गोंधळ घालणे, हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याच्या विधेयकावरून संसदेत पुन्हा जोरदार चर्चा-वादांची चाहूल लागली आहे. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम’ लाही त्यातून कायद्याचे कवच मिळणार आहे. ‘राष्ट्रीय सन्मानांचा अपमान (प्रतिबंधक) या पूर्वीच्याच कायद्यातील कलमात त्यानुसार दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. दिल्लीसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू असल्याने त्यावर अद्याप चर्चा होऊ शकलेली नाही. या चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूनेही या विषयावरील ‘राष्ट्राभिमानी-देशद्रोही’ किंवा ‘स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कोठे होतात,’ अशा मुद्द्यांची उजळणी अपेक्षितच. त्यामुळे राजकीय दृष्टीने या विधेयकाची वेळ पाहता, गेल्या आठवड्याभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, यांतून निसटू पाहणारा राजकीय सामना पुन्हा आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या हुकमी खेळपट्टीवर आणणारे सरकारचे हे पाऊल म्हणता येईल.

स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक भारतीयाच्या ओठी असलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतास नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संसदेतही खास चर्चा झाली. आता त्यापुढे एक पाऊल टाकून सन १९७१ च्या राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखणाऱ्या कायद्यात दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेत मांडले आहे. साठ-सत्तरच्या दशकांत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि घटनेचा अवमान करण्याचे प्रकार वाढू लागले होते. त्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या कायद्यात ‘जन गण मन’च्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेचीही तरतूद करण्यात आली. आता त्यात ‘वंदे मातरम’चाही समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत भारतीय अस्मितेचे प्रतीक बनले होते. मात्र, ‘या गीतातील काही कडवी हिंदू धर्मविशेषातून भारतीय राष्ट्रवाद परिभाषित करतात,’ असा आक्षेप ‘मुस्लिम लीग’सह काँग्रेसमधील एका गटाने घेतला; तर हे गीत पूर्ण स्वीकारावे, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचा आग्रह होता. त्या पार्श्वभूमीवर पं. नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे सल्ला मागितला; त्या सल्ल्यानुसार या गीताची दोन कडवी गाण्यावर एकमत झाले. पुढे संविधान सभेमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि दोन कडव्यांचे ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला. या शतकाच्या प्रारंभी त्यात दुरुस्तीही करण्यात आली, त्याच्या स्पष्टीकरणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक मर्यादेत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी निश्चित झाली आहे. त्यानुसार राष्ट्रगीत न गाणे, हे या कायद्यानुसार गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही; मात्र त्यात व्यत्यय आणणे हा नि:संशय गुन्हा आहे. हा प्रतीकांचा सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमारेषा स्पष्टपणे अधोरेखित झाल्यानंतर या वादावर पडदा पडणे अपेक्षित होते; मात्र तसे झालेले नाही.

काही महिन्यांपूर्वी सहा कडव्यांसह संपूर्ण ‘वंदे मातरम’ गाण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले; त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, तेव्हा ‘ही फक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत,’ असे स्पष्ट करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर नव्या विधेयकात ‘वंदे मातरम’ एवढाच उल्लेख आहे. प्रस्तावित कायद्यातील शिक्षेची तरतूद ही पहिल्या दोन कडव्यांपुरतीच असेल, की संपूर्ण गीतासाठी लागू असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यातून घटनात्मक धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उभा राहिल्यास पुन्हा न्यायालयीन मंथन होऊ शकते. राजकीय विरोधकांविरुद्ध हत्यार म्हणून या कायद्याचा वापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत या या कायद्यानुसार देशभरात सातशे गुन्हे दाखल झाले; त्यापैकी बहुसंख्य राष्ट्रगीताच्या कथित अवमानासंदर्भातील आहेत. मात्र, त्यातील फक्त दहा टक्के गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली, हेही लक्षात घ्यावे लागेल. राष्ट्रगीत-राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रध्वज या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान झालाच पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्यांचा अवमान करणाऱ्यांना अद्दलही घडलीच पाहिजे. मात्र, त्या आधारे कोणाला जाणीवपूर्वक लक्ष्यही करणे अयोग्य ठरेल. देशप्रेम हे समावेशकतेतून वाढते, याचीही जाणीव हवी. देशप्रेम आणि लोकशाही मूल्ये यांचे संतुलनच देशाला पुढे नेईल, हे नक्की.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा