![]()
अमरावती, चिखलदरा तालुक्यातील डोमी येथील प्राथमिक शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अतिरिक्त शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी नुकतीच एक विशेष ग्रामसभा घेतली, ज्यात या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देतो. या कायद्यानुसार विद्यार्थीसंख्या आणि शाळेच्या स्वरूपानुसार आवश्यक शिक्षकसंख्या निश्चित केली जाते. मात्र, डोमीसारख्या अतिदुर्गम आणि ‘कट ऑफ व्हिलेज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आहे. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी शाळेसमोरच ग्रामस्थांची पंचायत भरली. “गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार आदिवासी समाजातील मुलांना नाही का?” असा थेट सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत पुरेसे शिक्षक नसणे हे त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीत झालेल्या चर्चेनंतर, संपूर्ण गावाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोमी शाळेला तातडीने अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिक्षकाची नियुक्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. डोमीच्या शाळेत शिक्षकांची नियुक्ती हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून, अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने पाहते आणि किती लवकर निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.
Source link
डोमी शाळेत एकच शिक्षक, गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा:आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष ग्रामसभा
