Amravati : जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील बालरोग विभागातील आरेग्यसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

१२ आणि १७ मिनीबेड क्षमता असलेले दोन एनआयसीयू कक्ष
जळालेला दहा खाटांचा कक्ष वगळता इमारतीतील उर्वरित १२ आणि १७ मिनीबेड क्षमता असलेले दोन एनआयसीयू कक्ष तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नवजात बालकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांत किंवा बाहेर पाठविण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तातडीने सेवेत दाखल
आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेची उच्चस्तरीय पाहणी बैठक गुरुवारी झाली. यात रुग्णालयातील तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. उर्वरित दोन्ही अतिदक्षता कक्ष सर्व अद्ययावत वैद्यकीय संसाधनांसह सज्ज करून तातडीने सेवेत दाखल केले जातील.
विशेष फायर सेफ्टी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार
रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सदैव सतर्क राहण्यासाठी विशेष फायर सेफ्टी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. इमारतीचे विद्युतीकरण, उपकरणे, फायर ऑडिट आणि आपत्कालीन यंत्रणेतील त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग समन्वयाने तातडीने दूर करण्यात येणार आहे. रुग्णालयातील स्वच्छतेच्या कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशदेण्यात आले आहेत.
प्रशासनातर्फे आवाहन
अग्निकांडानंतर डफरीनमधील आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र, रुग्णालयातील सर्व सामान्य व तातडीच्या वैद्यकीय सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अग्निशमन अधिकारी उपस्थित
या बैठकीला अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीला वाकचौरे, सुपर स्पेशालिटीचे डॉ. अमोल नरोटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजया बोरा, डॉ. प्रिती इंगळे, डॉ. निलेश पाचबुद्धे, बांधकाम विभागाचे उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी, विद्युत विभागाचेविनोद गहुकर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे उपस्थित होते.
‘दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार’
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. भविष्यात राज्यामध्ये अशाप्रकारच्या घटना टाळण् यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांत उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. बोर्डीकर यांनी गुरुवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली.
समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार
जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशीत कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. रुग्णालयांतील बालके इतर रुग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.
युद्धपातळीवर काम सुरू
घटनेनंतर खबरदारी म्हणून बालकांना इतरत्र हलवले होते. मात्र आता रुग्णालयातच बालकांसाठी सुरक्षित व अत्याधुनिक उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी उर्वरित दोन्ही एनआयसीयू कक्ष पूर्ण क्षमतेने सज्ज करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
२९ बालक बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीत सुरक्षित
या घटनेत ज्या ३६ बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. त्यातील २९ बालक अजूनही शहरातील पीडीएमसी, होप हॉस्पिटल, मुरके हॉस्पिटल, पारिजात हॉस्पिटल येथे बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीत सुरक्षित आहेत. तर सात बालक जिल्हा स्त्री रुग्णालयात मातांसह भरती असून या सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली आहे.

