Headlines

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 237 मि.मी. पाऊस:कसारा घाटातील रेल्वे पूर्ववत, नदीपातळीवर सातत्याने लक्ष; एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात




ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येत आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, एनडीआरएफच्या दोन तुकड्याही जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ यांनी दिली. १ जूनपासून ७०५.६५ मि.मी. पावसाची नोंद जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या दि.६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात मागील २४ तासांत २३७.६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दि. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७०५.६५ मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. पाणीपातळीवर प्रशासनाचे विशेष लक्ष अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीचे सातत्याने निरीक्षण करण्यात येत आहे. उल्हास नदीच्या मोहने, जांभूळपाडा आणि बदलापूर येथील पाणीपातळीवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. बदलापूर आणि जांभूळपाडा येथे पाणीपातळीने इशारा पातळी ओलांडली असली, तरी संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील काळू नदी तसेच शहापूर तालुक्यातील भातसा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे. धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्गाची माहितीही नियमितपणे घेतली जात असून, परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कसारा घाटातील रेल्वे पूर्ववत अतिवृष्टीमुळे कसारा घाट परिसरात रेल्वे मार्गावर आलेला मलबा रेल्वे प्रशासनाने तातडीने हटविला असून, मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोकल रेल्वे सेवा सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. मात्र, रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत. जिल्ह्यातील रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू असल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी National Disaster Response Force अर्थात एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि ३० अधिकारी व जवान ठाणे जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत. यामुळे आवश्यकतेनुसार मदत व बचावकार्य अधिक वेगाने राबविण्यास प्रशासन सज्ज आहे. विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी अंबरनाथ तालुक्यातील नागाव परिसरात एका मुलाला नदीच्या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित बचाव यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीच्या कालावधीत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली असून काही नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित घटनांची नोंद घेऊन प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांनी नदी, नाले, पूल, सखल भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत चोवीस तास लक्ष जिल्ह्यातील पर्जन्यमान, नदीपातळी, धरणांतील पाणीसाठा, वाहतूक व्यवस्था आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ व क्षेत्रीय अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात आला असून, नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि नदी, नाले, धबधबे, पूल व पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचे टाळावे, झाडाखाली उभे राहणे, खरोखरच गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत