Headlines

जर्सीवर ‘नंबर 3’ दिसण्यासाठी वैभव सूर्यवंशीचं एवढं भारी जुगाड! कारणही खास आहे, नेमकं काय?


Vaibhav Sooryavashi jersey Tape News : दलीप ट्रॉफी २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीच्या जर्सीवर लावलेल्या टेपने सर्वांचे लक्ष वेधले. नंबर ३ साठी त्याने हा खास जुगाड का केला, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

Vaibhav Sooryavashi jersey Number
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ च्या रणसंग्रामात १५ वर्षांचा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ईस्ट झोनकडून नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळताना या युवा खेळाडूने फलंदाजीत निराशा केली असली, तरी गोलंदाजीत भल्याभल्यांना मोठा धक्का दिला. मात्र, त्याच्या खेळापेक्षा सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती त्याच्या जर्सीची! या सामन्यात वैभव आपल्या जर्सीच्या पाठीमागे चक्क टेप लावून खेळताना दिसला. यामागचं नेमकं कारण काय आणि त्याच्या नंबर ३ चं रहस्य काय आहे? हे आता समोर आलं आहे.

वैभवने जर्सीवर टेप का लावली?

या सामन्यात मैदानात उतरताना वैभवने आपल्या जर्सीवरील नंबरच्या जागी टेप लावली होती. यामागचे कारण अत्यंत रंजक आहे. वैभवचा लकी आणि आवडता जर्सी नंबर ‘३’ आहे. मात्र, या स्पर्धेत आयोजकांकडून त्याला जो जर्सी नंबर मिळाला होता, त्याच्या आधी दुसराच एक अंक होता आणि शेवटी ‘३’ होता. अशा वेळी आपला लाडका नंबर ३ तसाच दिसावा आणि इतर अंक लपावेत, यासाठी वैभवने शक्कल लढवत त्या अतिरिक्त अंकावर चक्क टेप लावली आणि संपूर्ण सामना तो याच अवस्थेत खेळताना दिसला.

Maharashtra TimesIND vs SL News : सर्वाधिक ट्रोल झाला, टीममधील जागेवरही प्रश्नचिन्ह होतं; आता श्रीलंकेत चमकला, कोचनं ‘वर्ल्ड क्लास’ बॉलरची पदवी दिली

‘नंबर ३’ चं आईशी खास कनेक्शन

वैभवसाठी ३ हा आकडा केवळ एक नंबर नसून त्याचे एक अत्यंत भावनिक कनेक्शन आहे. हा नंबर तो आपला ‘फेवरेट’ मानतो, कारण याचा थेट संबंध त्याच्या आईशी जोडलेला आहे. याच भावनिक कारणास्तव वैभव आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतानाही याच ‘३’ नंबरची जर्सी परिधान करून मैदानात उतरतो.

फलंदाजीत फ्लॉप, पण गोलंदाजीत कमाल

जर्सीवर टेप लावूनही वैभवला या सामन्यात बॅटने फारशी चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या ८ धावा करून स्वस्तात माघारी परतला. रेड-बॉल क्रिकेटमधील त्याचे हे अपयश आता चिंतेचा विषय बनू पाहत आहे. कारण, याआधी रणजी ट्रॉफीमध्येही त्याला मोठी खेळी करता आली नव्हती, मात्र, फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या वैभवने गोलंदाजी करताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने अवघ्या ३ षटकांत ११ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी आपल्या नावावर केले आणि आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवून दिली.

Maharashtra TimesIPL 2027 : फ्लेमिंगनंतर CSKचा हेड कोच कोण? मॅथ्यू हेडनने थेट नाव सांगून टाकलं; म्हणाला, चेन्नई टच चेहरा हवा!

आता सेंट्रल झोनविरुद्ध खरी अग्निपरीक्षा

या विजयासह ईस्ट झोनच्या संघाने आता दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, तिथे त्यांचा सामना सेंट्रल झोनशी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात वैभवला आपल्या बॅटची ताकद दाखवून टीकाकारांची तोंडे गप्प करावी लागतील. जर त्याने या सामन्यात मोठी खेळी केली, तर तो ‘इंडिया अ’ च्या रेड-बॉल संघात आपली दावेदारी भक्कम करू शकेल. टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या वैभवची रेड-बॉल क्रिकेटमधील ही खऱ्या अर्थाने मोठी ‘अग्निपरीक्षा’ असणार आहे.