दोन्ही सभागृहात गोंधळ : संसदीय कामकाजमंत्र्यांची पुन्हा राहुल गांधींशी चर्चा, लोकसभेचे कामकाज आजपर्यंत तहकूब,राज्यसभेत विरोधी खासदारांचा सभात्याग
स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षांचे प्रश्न….
- आंदोलनावेळी पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?
- बळाचा वापर कायद्यानुसार व स्थापित कार्यपद्धतीनुसार होता का?
- किती विद्यार्थी जखमी झाले, तसेच किती जणांना ताब्यात घेतले?
- पोलिसांविरुद्ध तक्रारी आहेत का, त्यांच्यावर काय कारवाई केली?
- सरकार याप्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करणार आहे का?
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची अपेक्षा करत विरोधी पक्षांनी गोंधळ सुरू ठेवल्याने संसदेचे कामकाज अद्यापही रखडलेलेच आहे. काही किरकोळ स्वरुपात कामकाज सुरू असले तरी विरोधकांच्या गदारोळामुळे त्यात वारंवार व्यत्यय येत आहे. अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी करत काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांनी गुरुवारी राज्यसभेतून सभात्याग केला. दुसरीकडे लोकसभेचे कामकाजही शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, सभागृहातील कामकाज योग्यरितीने चालण्यासाठी संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेअंती विरोधी पक्ष आता कोणती भूमिका घेतो यावर शुक्रवारचे कामकाज अवलंबून असेल.
पावसाळी अधिवेशनाचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. याचदरम्यान गुरुवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला. यानंतर, अध्यक्षांनी विरोधी पक्षांना सभागृहाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी नकार दिल्याने कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही दुपारपर्यंत दोनवेळा तहकूब करावे लागले. सुरुवातीला वरिष्ठ सभागृहाचे कामकाज सकाळी 11:30 वाजता तहकूब करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता पुन्हा सुरू झाल्यानंतर सुमारे अर्धा तास गदारोळात कामकाज सुरू राहिल्यानंतर दुपारी 2:15 वाजेपर्यंत पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले.
काँग्रेस खासदाराकडून स्थगन प्रस्ताव दाखल
काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्याची नोटीस दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात याप्रकरणी सविस्तर निवेदन द्यावे अशी मागणी केली आहे. हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असून त्यावर तातडीने चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधूर, पेलेट गन आणि पाण्याचे फवारे वापरल्याचे आरोप झाले आहेत, ज्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट पेले.
राज्यसभेत सत्ताधाऱ्यांची काँग्रेसविरोधात घोषणाबाजी
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. भाजप नेते आणि महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. ‘दहशतवादी कुठे सापडतील… काँग्रेसच्या कार्यालयात’ अशा घोषणा सभागृहात घुमल्या. चर्चेदरम्यान बोलताना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी 2014 पूर्वीच्या राजकीय वातावरणाचा संदर्भ दिला. 2014 पूर्वी कोळसा चोर, भ्रष्ट लोक आणि दहशतवादी कुठे सापडतील हे प्रत्येक लहान मूलही सांगू शकत होते. बोंडे यांनी हा प्रश्न विचारताच सत्ताधारी पक्षातील इतर भाजप खासदारांनी ‘काँग्रेसच्या कार्यालयात’ अशी घोषणाबाजी करत तात्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर खासदार अनिल बोंडे यांनी ‘देशद्रोही कुठे सापडतील’ राष्ट्रविरोधक कुठे सापडतील? लष्करविरोधी लोक कुठे सापडतील? आणि शेतकरीविरोधी कुठे सापडतील?’ असा जोरदार आवाज उठवताच या प्रश्नांना उत्तर देताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी ‘काँग्रेस कार्यालयात’ अशी घोषणाबाजी केली. सभागृहातील सततचा गदारोळ आणि गोंधळ पाहून पीठासीन अधिकारी, उपसभापती हरिवंश यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. खासदार बोंडे यांना मध्येच थांबवून, उपसभापतींनी त्यांना सक्त ताकीद दिली. विषयांतर न करता चालू असलेल्या विषयावरच बोलावे अशी सूचना त्यांना करण्यात आली.
विरोधी पक्षांकडून संसदेबाहेर आंदोलन
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. 20 जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईवरून आणि अयोध्या राम मंदिराला अर्पण केलेल्या वस्तूंची कथित चोरी व अपहार झाल्याच्या आरोपावरून त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी ‘चंदा चोर, गद्दी छोड’ असे लिहिलेले फलक प्रदर्शित केले, तर इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘अमित शाह यांना उत्तर द्या’ अशी मागणी करणारे फलक हातात धरले होते.
