Headlines

कसा आहे प्रार्थना बेहेरेचा मर्दिनी सिनेमा?


आई हे नातं केवळ जन्म देण्यापुरतं मर्यादित नसतं; तर ते संरक्षण, त्याग, संघर्ष आणि प्रसंगी संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य देणारंही असतं. मुलावर संकट आलं, की एका सामान्य स्त्रीच्या अंतरंगात दडलेली योद्धा जागी होते, हा विचार श्रेयस तळपदे निर्मित, अजय मयेकर दिग्दर्शित ‘मर्दिनी’च्या केंद्रस्थानी आहे. ‘आई तारी त्याला कोण मारी’ या आशयाला गाभा मानून दिग्दर्शक मयेकर यांनी एका आईच्या लढ्याची भावनिक आणि थरारक कथा ‘उंदीर मांजराच्या पकडापकडीच्या खेळा’ प्रमाणे पडद्यावर मांडली आहे.

आजच्या काळातील सायबर गुन्हेगारी विश्व, सामाजिक वास्तव, मातृत्वातील हतबलता आणि त्यातून जन्माला येणारी लढाऊ वृत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न सिनेमात दिसतो. त्यामुळे ‘मर्दिनी’ हा केवळ एक क्राइम-ड्रामा राहत नाही, तर आईच्या निश्चय, जिद्द आणि अदम्य शक्तीचा प्रवास ठरतो. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहणाऱ्या आईपणाची मर्दुमकीच या सिनेमातून उलगडते.

मुंबईतील एका चाळीत राहणारी अंजली घोरपडे (प्रार्थना बेहेरे), तिची लाडकी लहान शाळकरी मुलगी ओवी (मायरा वायकुळ) आणि आई यांचं छोटंसं विश्व सिनेमाच्या सुरुवातीला उलगडतं. ओवीभोवती फिरणारं अंजलीचं आयुष्य आणि त्यांच्या नात्यातील निरागस क्षण प्रेक्षकाला कथेशी जोडून ठेवतात. ओवीला दम्याचा आजार असल्यानं; अंजलीला क्षणोक्षणी तिची काळजी लागून राहिलेली असते. आर्थिक स्थिती मध्यमवर्गीय असलेली कसेबसे पैसे गोळा करून सव्वा लाखाचं ‘ऑक्सिजन मशीन’ आपल्या मुलीसाठी ऑनलाइन खरेदी करते. मुळात या उपकरणाची मूळ बाजारभावातील रक्कम ही अडीच-तीन लाख रुपयांच्या घरात असते. परंतु, ऑनलाइन ऑफर पाहून; कमी किंमतीत अंजली ते खरेदी करते आणि तिच्यासोबत ‘स्कॅम’ होतो. ती पोलिसांकडे धाव घेते; वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत गायतोंडे (जितेंद्र जोशी) आणि इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वे (अभिजित खांडकेकर) यात लक्ष घालतात. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची स्वतःची अशी ‘गोष्ट’ लगोलग प्रेक्षकांना पटकथेत समजेल. मात्र, एका मागोमाग एक धक्कादायक घटनांनंतर अंजलीच्या कुटुंबाच्या आयुष्यात संकटांचं वादळ येतं. आपल्या मुलीच्या रक्षणासाठी आणि न्यायासाठी अंजली जेव्हा व्यवस्थेविरुद्ध उभी राहते, तेव्हा तिच्यातील ‘मर्दिनी’ जागी होते. महाबळेश्वर नार्वेकर यांनी कथा, पटकथा आणि संवादांतून भावनिक नात्यांसोबत रहस्याचीही पेरणी केली आहे. खलनायकाचा चेहरा उशिरापर्यंत गुप्त ठेवल्यामुळे उत्कंठा टिकून राहते. मात्र, कथानकातील काही घडामोडी अपेक्षित वाटतात आणि त्यामुळे पटकथेचा प्रभाव काहीसा कमी होतो. सोबतच सुज्ञ प्रेक्षकांना खलनायक नेमका कोण असणार? याचा अंदाज आधीच येतो. त्यासाठी पटकथेत आणि संवादात काही गोष्टी जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या आहेत. हा सर्व कथाप्रवास प्रेक्षकांना उंदीर-मांजराच्या पकडापकडीच्या खेळाप्रमाणे पडद्यावर दाखवण्यात आला आहे. त्यात आता नेमकं उंदीर कोण आणि मांजर कोण? कोण कोणावर मात करतं? कोण पळ काढतं ? हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावरच समजेल आणि उमजेल.

दिग्दर्शक अजय मयेकर यांनी सिनेमाची भावनिक बाजू चांगली हाताळली आहे. पूर्वार्धात आई-मुलीच्या नात्यातील हळवे क्षण आणि त्यांच्यातील जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात घर करतो. त्यामुळे पुढे येणाऱ्या घटनांचा भावनिक परिणाम अधिक तीव्र होतो. सिनेमातील थराराची मांडणीही सुरुवातीला प्रभावी वाटते. मात्र, मध्यंतरानंतर कथानकाचा वेग मंदावतो. काही प्रसंग अनावश्यकपणे लांबलेले वाटतात आणि त्यामुळे सिनेमाची पकड सैल झाल्याचं जाणवतं. अभिषेक सेठ यांचं संकलन आणखी नेमकं असतं, तर सिनेमा अधिक प्रभावी ठरला असता. शब्बीर नाईक याचं छायांकन कथेला आवश्यक असलेला वास्तववादी पोत देतं.

Aamir khan 3rd wedding: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला अंबानी कुटुंबाची हजेरी, वाटेत झाड कोसळल्यानं गाड्यांचा ताफा थांबला, राज ठाकरेंचीही उपस्थिती
अभिनयाच्या बाबतीत ‘मर्दिनी’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रार्थना बेहेरे आणि अभिजित खांडकेकर. अंजलीच्या भूमिकेत प्रार्थनानं आईची ममता, असहायता आणि संघर्ष करणारी वृत्ती प्रभावीपणे उभी केली आहे. तिच्या अभिनयात प्रामाणिकपणा जाणवतो आणि त्यामुळे व्यक्तिरेखा अधिक जवळची वाटते. अभिजित खांडकेकर यानं इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वेच्या भूमिकेत संयत आणि विश्वासार्ह अभिनय साकारला आहे. त्यानं व्यक्तिरेखेतील गूढता आणि मृदुता दोन्ही बाबी सहजतेनं पडद्यावर उभ्या केल्या असून, कथानकाला आवश्यक असलेला थरार टिकवून ठेवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. बालकलाकार मायरा वायकुळनं ओवीच्या भूमिकेत निरागसतेचा गोड स्पर्श दिला आहे. जितेंद्र जोशी यांनी साकारलेले इन्स्पेक्टर सूर्यकांत गायतोंडे आपल्या सहज अभिनयामुळे लक्षात राहतात.

Aamir khan and Gauri spratt Marriage: तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आमिर खान, गौरी स्प्रॅटसोबतच्या रजिस्टर मॅरेजचा पहिला फोटो समोर
पण, पटकथेत या व्यक्तिरेखेचा ‘स्क्रीन टाइम’अधिक असायला हवा होता. एकूणच, ‘मर्दिनी’ हा मातृत्वाचं सामर्थ्य दाखवणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. सिनेमाचा भावनिक गाभा, प्रमुख कलाकारांचा अभिनय आणि आई-मुलीच्या नात्याचं हृदयस्पर्शी चित्रण या त्याच्या जमेच्या बाजू ठरतात. मात्र, संथ गती, काही ठिकाणी लांबणारी पटकथा आणि अपेक्षित वळणं यामुळे सिनेमा अधिक प्रभावी होण्याची संधी गमावतो; तरीही प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारी आणि एका आईच्या संघर्षाची कहाणी सांगणारी ही कलाकृती आहे. मनोरंजनासोबतच भावनिक अनुभव देणारा हा सिनेमा आपल्या आशयामुळे लक्षात राहतो, तरी तो पूर्ण क्षमतेनं झेप घेताना दिसत नाही.

सिनेमा : मर्दिनी

निर्मिती : श्रेयस तळपदे, दीप्ती तळपदे
दिग्दर्शन : अजय मयेकर
कथा, पटकथा आणि संवाद : महाबळेश्वर नार्वेकर
कलाकार : प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, मायरा वायकुळ.
संकलन: अभिषेक सेठ
छायांकन : शब्बीर नाईक
दर्जा: तीन स्टार



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत