Headlines

एलियन्स, डार्क मॅटरचं टेन्शन वाढणार! NASA चा सर्वात खतरनाक ‘डोळा’ SpaceX च्या रॉकेटमध्ये फिट, अवकाशात होणार धमाका। Maharashtra Times


अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ चा अत्यंत शक्तिशाली ‘नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप’ प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. फ्लोरिडा येथे या महाकाय टेलिस्कोपला ‘स्पेसएक्स’ च्या ‘फाल्कन हेवी’ रॉकेटमध्ये सुरक्षितपणे बंद (Encapsulate) करण्यात आले असून, येत्या 30 ऑगस्ट रोजी या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून गेऊया.

NASA Roman Space Telescope । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
खगोलशास्त्राचा इतिहास बदलण्यासाठी नासा आणि स्पेसएक्स सज्ज झाले आहेत. नासाचा नवा रोमन टेलिस्कोप हबलपेक्षा 100 पट जास्त व्यापक क्षेत्राचे फोटो एकाच क्लिकमध्ये घेऊ शकतो. हा टेलिस्कोप अंतराळातील अथांग अंधाऱ्या विश्वाचा, म्हणजेच ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’चा शोध घेऊन विज्ञानाला नवी दिशा देणार आहे.

ब्रह्मांडातील डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि लपलेल्या ग्रहांचा वेध घेण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ चा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप ‘ प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, या महाकाय टेलिस्कोपला ‘स्पेसएक्स’ च्या सर्वात शक्तिशाली ‘फाल्कन हेवी’ रॉकेटच्या पेलोड फेअरिंगमध्ये सुरक्षितपणे बंद करण्यात आले आहे.

नासाच्या ब्लॉगनुसार, (REF.) 30 ऑगस्ट 2026 रोजी फ्लोरिडातील लॉन्च कॉम्प्लेक्स 39A वरून या ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले जाईल.

हबलपेक्षा 100 पट शक्तिशाली ‘वाईड फील्ड’ नजर

वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही मोहीम खगोलशास्त्राचा इतिहास बदलणारी ठरणार आहे. ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ विश्वातील अतिशय सूक्ष्म आणि खोलवरचे तपशील दाखवतो, तर ‘रोमन टेलिस्कोप’ अंतराळातील अथांग आणि प्रचंड मोठ्या भागाचा एकाच वेळी वेध घेईल. या टेलिस्कोपमध्ये 2.4 मीटर व्यासाचा मुख्य आरसा बसवण्यात आला असून, याच्या 300.8 मेगापिक्सेल क्षमतेच्या ‘वाईड फील्ड इन्स्ट्रुमेंट’ मुळे हा टेलिस्कोप हबल टेलिस्कोपपेक्षा तब्बल 100 पट मोठा आकाशाचा भाग एकाच फोटोमध्ये टिपू शकतो.

डार्क मॅटर आणि 1 लाख नवीन ग्रहांचा शोध

‘ScienceDaily’ च्या (REF.) वृत्तानुसार, या 5 वर्षांच्या मुख्य मोहिमेचे उद्दिष्ट विश्वातील दोन सर्वातमोठ्या गूढ शक्तींचा म्हणजेच ‘डार्क एनर्जी’ आणि ‘डार्क मॅटर’चा शोध घेणे हे आहे. आपल्या विश्वाचा वेगाने होणारा विस्तार नक्की कोणत्या अदृश्य शक्तीमुळे होत आहे, हे समजून घेण्यासाठी रोमन टेलिस्कोप कोट्यवधी आकाशगंगांचे नकाशे तयार करेल. याशिवाय, आपल्या सूर्यमालेबाहेर असलेल्या साधारण 1,00,000 नवीन ग्रहांचा शोध घेणे हे देखील या वेधशाळेचे काम असेल.

‘लॅग्रांज पॉईंट 2’ कडे प्रवास

उड्डाणादरम्यान पृथ्वीच्या वातावरणातील प्रचंड आवाज, दाब आणि उष्णता यांपासून टेलिस्कोपचे रक्षण करण्यासाठी त्याला रॉकेटच्या फेअरिंगमध्ये बंद केले जाते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे फेअरिंग वेगळे होईल आणि रोमन टेलिस्कोप पृथ्वीपासून साधारण 15 लाख किलोमीटर दूर असलेल्या ‘लॅग्रांज पॉईंट 2’ (L2) च्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल. याच ठिकाणी राहून हा टेलिस्कोप दरवर्षी 500 टेराबाइटपेक्षा जास्त डेटा पृथ्वीवर पाठवणार आहे, जो हबलने 35 वर्षांत पाठवलेल्या डेटापेक्षा जास्त आहे.

नासा आणि स्पेसएक्सच्या इंजिनिअर्सनी नुकतीच याची ‘फ्लाइट रेडीनेस रिव्ह्यू’ चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, हा टेलिस्कोप त्याच्या मूळ वेळेच्या 9 महिने आधी आणि बजेटच्या आत पूर्ण झाला आहे, ही विज्ञानाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जात आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा