Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:इतिहास ओझे नाही, तर एक वारसा आहे




जेव्हा जेव्हा मी पाहुण्यांना मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर घेऊन जातो, तेव्हा त्यांना सांगतो की 1940 ते 1980 च्या दशकापर्यंत हा परिसर बॉम्बेच्या (आताची मुंबई) सर्वात गजबजलेल्या चित्रपट निर्मिती केंद्रांपैकी एक होता. मोहन स्टुडिओमध्ये मुघल-ए-आझम, देवदास आणि बंदिनी यांसारख्या महान चित्रपटांचे शूटिंग झाले होते. मुघल-ए-आझमसाठी के. आसिफ यांनी येथे लाहोर किल्ल्याच्या धर्तीवर आयकॉनिक शीश महालचा सेट बनवला होता. सुमारे 150 फूट × 80 फूट × 35 फूट आकाराचा हा सेट तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली, ज्यामध्ये फिरोजाबादच्या कारागिरांनी तयार केलेले बेल्जियम ग्लासचे हजारो तुकडे वापरले होते. 1950 च्या दशकाच्या शेवटी उभारलेल्या या सेटवर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता, जी त्या काळी खूप मोठी रक्कम होती. पण जेव्हा मी त्यांना ही विडंबना सांगतो की त्या स्टुडिओमध्ये महिलांसाठी एक चांगला वॉशरूमदेखील नव्हता, तेव्हा ते माझ्याकडे संशयाने पाहतात आणि विचार करतात की हे कसे शक्य आहे. ते नेहमी विचारतात की, जे स्टुडिओ मॅनेजमेंट सेटवर इतका खर्च करू शकत होते, ते त्या अभिनेत्रींसाठी टॉयलेट का बांधू शकले नाहीत, ज्यांच्यामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी उसळत असे. मग मी त्यांना सांगतो की अभिनेत्री वहिदा रहमान यांच्याबद्दल सर्च करा, ज्या सांगायच्या की त्या शूटिंगदरम्यान पाणी पिणे टाळायच्या. आशा पारेख यांनीही एकदा म्हटले होते की त्या सुदैवी होत्या, कारण दीर्घ शूटिंग शेड्युलदरम्यान सलग वॉशरूमला जाणे टाळूनही त्यांना कधी किडनीची समस्या उद्भवली नाही. रेणुका शहाणे यांनीही म्हटले होते की 1990 च्या दशकातही फिल्म सेटवर अनेक महिला पाणी पिणे टाळायच्या, कारण तिथले वॉशरूम अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसायचे. सिनेसृष्टीची भव्यता आणि अभिनेत्रींच्या या अडचणींमधील विरोधाभास ऐकल्यानंतर पाहुणे विचारतात की, ‘काय आपण तो स्टुडिओ पाहू शकतो?’ दुर्दैवाने मी त्यांना त्या काळातील एक वीटही दाखवू शकत नाही. तो स्टुडिओ आता नाहीसा झाला असून त्या जागी निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मी हे सांगून विषय संपवतो की, ‘जेव्हा एखादा स्टुडिओ संपतो, तेव्हा त्यासोबत भारतीय सिनेमाचा एक संपूर्ण अध्याय संपतो आणि इतिहासाचा एक भागही विस्मरणात जातो.’ मंगळवारी माझ्यासोबत वेस्ट शिकागोहून आलेले पाहुणे होते. ते लगेच म्हणाले, ‘देवाचे आभार की इलिनॉयमध्ये दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेल्या 1913 मध्ये बांधलेल्या एका खोलीच्या शाळेची अखेर सुधारणा केली जात आहे. आता तिथे जिल्ह्याचे इन्स्ट्रक्शनल कोच बसतील, जे टीचिंग आणि लर्निंगमध्ये स्थानिक शाळांना मदत करतील.’ ही शाळा आता एक जिवंत एज्युकेशनल रिसोर्स बनेल, ज्यामुळे तरुण शिक्षकांना समजेल की एकेकाळी अमेरिकेत सामान्य असलेल्या एका खोलीच्या शाळा प्रत्यक्षात कशा दिसायच्या. एका एकरापेक्षाही कमी जागेत पसरलेली ही इमारत आता केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदलेली राहणार नाही, तर भावी शिक्षकांना शिक्षणाच्या विकासाबद्दल माहिती देत राहील.नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात माझी भेट साऊथ एक्सटेन्शनच्या एका स्थानिक इतिहासकाराशी झाली. त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला की त्यांच्या परिसराला हे नाव कसे पडले. त्यांच्या मते या वसाहतीला हे नाव पडले कारण कॅनॉट प्लेसच्या आसपास ब्रिटिशांनी वसवलेल्या नवी दिल्लीचा दक्षिणी एक्सटेन्शन (विस्तार) म्हणून तिचा विकास करण्यात आला होता. याला कोणताही अधिकृत पुरावा नसला, तरी अनेकांचे असे मानणे आहे की याचे नाव त्याच भौगोलिक क्षेत्रातून आले आहे, जिथे कधीकाळी ‘साऊथ-एंड रोड’ नावाचा रस्ता होता. नंतर त्या रस्त्याचे नाव बदलून पिलू मोदी रोड केल्यामुळे एक गुंतागुंतीचा ऐतिहासिक डिस्कनेक्ट निर्माण झाला. येणाऱ्या पिढ्या विचार करू शकतात की एखाद्या परिसराचे नाव ‘साऊथ एक्सटेन्शन’ का ठेवले असेल, जेव्हा जिथून त्याचा विस्तार सुरू झाला, त्याच्या आसपास मिळत्याजुळत्या नावाची कोणतीही जागा नाहीये. अशा वेळी या नावामागचा भौगोलिक तर्क कमी स्पष्ट होतो आणि जुने नकाशे, ऐतिहासिक रेकॉर्ड किंवा या विषयावर पुस्तके लिहिणाऱ्या इतिहासकारांशिवाय दिल्लीचा शहरी विकास समजून घेणे कठीण होऊन जाते. जेव्हा जुन्या इमारती पाडल्या जातात किंवा ऐतिहासिक नावे गायब होतात, तेव्हा आपण केवळ विटा, रस्ते किंवा लँडमार्कच गमावत नाही, तर आपली शहरे, संस्था आणि ओळखीच्या विकासाला उलगडणाऱ्या कथाही पुसून टाकतो. फंडा असा आहे की, इतिहास हे ओझे नाही, जे वाहावे लागेल. तो एक वारसा आहे, जो भावी पिढ्यांसाठी जतन करून ठेवला पाहिजे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत