Headlines

एकाला स्वतःला सिद्ध करायचंय, दुसऱ्याला टीम इंडियात परतायचंय; दुलीप ट्रॉफीत कोण दाखवणार दम?


Duleep Trophy 2026, Vaibhav Sooryavanshi : दुलीप ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामाला उद्यापासून म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी सुरुवात होत आहे. बेबी बॉस वैभव सूर्यवंशी आता या देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीचे भविष्यावर निवड समिती आणि अनेक माजी खेळाडू यावेळी युवा खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेऊन असणार आहेत.

Duleep Trophy 2026-27
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाचा बिगुल अखेर वाजला आहे. दुलीप ट्रॉफी २०२६-२७ (Duleep Trophy 2026-27) स्पर्धेला रविवारपासून (२३ ऑगस्ट) बेंगळुरूमध्ये सुरुवात होत आहे. मागील काही वर्षांत अनेक बदलांमधून गेलेली ही स्पर्धा आता पुन्हा एकदा तिच्या जुन्या आणि पारंपरिक ‘इंटर-झोनल’ फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. हा देशांतर्गत हंगाम भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, आगामी महिन्यांत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा फायनलचा मार्ग आणि घरच्या मैदानावर होणारी बहुचर्चित ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ यासाठी संघबांधणी याच स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे. त्यामुळे निवड समितीची करडी नजर या स्पर्धेवर असेल.

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची खरी कसोटी

या स्पर्धेत सर्वांच्या नजरा खिळल्या असतील त्या ईस्ट झोनकडून खेळणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर! वैभवच्या टीमची कमान स्फोटक फलंदाज ईशान किशनच्या हाती असून, उद्या त्यांचा पहिला सामना नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध बेंगळुरूतील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) ग्राऊंड-२ वर सकाळी ९:३० वाजता सुरू होईल.

आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर इंग्लंड दौऱ्यावर टी-२० इंटरनॅशनलमध्ये पदार्पण करणारा आणि झिम्बाब्वे दौऱ्यात ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरणारा वैभव पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये (White-ball cricket) सुपरहिट ठरला आहे. पण आता त्याला सिद्ध करावे लागेल की तो ‘रेड-बॉल’ क्रिकेटमध्येही तितकाच घातक आहे. कारण, रणजी ट्रॉफीमध्ये त्याचे आकडे फारसे प्रभावी नाहीत (१२ डावांत केवळ १७.२५ ची सरासरी). या स्पर्धेच्या तयारीसाठी वैभवने राजस्थान रॉयल्सच्या ताळेगाव येथील हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवड्यांचे विशेष ‘रेड-बॉल बूटकॅम्प’ केले आहे. तिथे त्याने लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर फिरकी आणि बाऊन्सचा सामना करण्याची कसून तयारी केली आहे.

Maharashtra TimesAUS vs BAN : बांगलादेशच्या खेळाडूचा रडीचा डाव, कॅच पकडतानाच मध्येच आला, पण कांगारूंनी पुढच्या ओव्हरमध्ये जिरवली

नॉर्थ झोनमध्ये आता जम्मू-काश्मीरचा दबदबा

ऐतिहासिकदृष्ट्या नॉर्थ झोनच्या संघात नेहमीच दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या खेळाडूंची मक्तेदारी असायची. पण यावर्षी चित्र पूर्णपणे पालटले आहे. मार्चमध्ये जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीचे फळ म्हणून यंदा नॉर्थ झोनच्या संघात जम्मू-काश्मीरच्या तब्बल ६ खेळाडूंनी धडक मारली आहे. विशेष म्हणजे संघाचे कर्णधारपदही कन्हैया वाधवान याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

या संघात कामरान इक्बालची कहाणी विशेष रंजक आहे. तो रणजी फायनलच्या सकाळपर्यंत संघात नव्हता, पण ऐनवेळी संधी मिळताच त्याने कर्नाटकविरुद्ध नाबाद १६० धावांची मॅरेथॉन खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. आता तो नॉर्थ झोनकडून डावाची सुरुवात करताना दिसेल. तसेच गोलंदाजीत सुनील कुमार (गेल्या हंगामात ३१ बळी) आणि युद्धवीर सिंग या वेगवान गोलंदाजांवर मोठी मदार असेल. (आकिब नबी भारत-श्रीलंका मालिका संपल्यानंतर संघात सामील होईल).

Maharashtra TimesGautam Gambhir : पत्रकाराच्या त्या प्रश्नावर गौतम गंभीरने झटकले हात, कॅप्टन गिलकडे दाखवलं बोटं; नेमका कोणता?

शमीने अद्याप हार मानलेली नाही

दुसरीकडे, ३५ वर्षांचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ नंतर गुडघ्याच्या आणि घोट्याच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून, दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून ‘रेड-बॉल’ क्रिकेटमध्ये धमाकेदार कमबॅक करत राष्ट्रीय संघात जागा मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चे वेळापत्रक

  • उपांत्यपूर्व फेरी १ (QF 1): ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ-ईस्ट झोन (२३ ऑगस्टपासून, बेंगळुरू)
  • उपांत्यपूर्व फेरी २ (QF 2): नॉर्थ झोन विरुद्ध वेस्ट झोन (२३ ऑगस्टपासून, बेंगळुरू)
  • पहिला उपांत्य सामना (SF 1): सेंट्रल झोन विरुद्ध (TBA) (३० ऑगस्टपासून, बेंगळुरू)
  • दुसरा उपांत्य सामना (SF 2): साऊथ झोन विरुद्ध (TBA) (३० ऑगस्टपासून, बेंगळुरू)
  • महाअंतिम सामना (Final): ६ सप्टेंबरपासून, चेन्नई.
सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा