![]()
अमरावती जिल्ह्यात शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी विविध ठिकाणी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत (गर्ल्स हायस्कुल) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना मोफत पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणही केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष संदीप संगवे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती वृंदावनाताई बोरकर आणि मुख्याध्यापक बालकृष्ण आंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. नवीन पाठ्यपुस्तके व गणवेश मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणारी विद्यार्थिनी एकता हिवे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, ज्या विद्यार्थिनींचा वाढदिवस होता, त्यांचेही विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन विरेंद्र ब्राह्मण यांनी केले, तर आभार शिक्षक सुरेंद्र मेटे यांनी मानले. दुसरीकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ब्राह्मणवाडा (गोविंदपूर) येथेही प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी सीईओ गांधी यांनी स्वतः बैलगाडीवर सजविलेल्या रथाचे सारथ्य करत नवीन विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वादही घेतला. सीईओ गांधी यांनी नवागतांचे स्वागत केले, पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण केले आणि विद्यार्थ्यांशी हितगुज करत शाळेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी पाचवीपासूनच आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार पुढे जायला हवे, असा हितोपदेश त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या प्रशासक स्नेहलताई भुयार होत्या. केंद्रप्रमुख कैलास पुनसे, कमलेश चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमकुमार बागडे, उपाध्यक्ष प्रशांत धोत्रे तसेच समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कब-बुलबुल पथकाने सीईओंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून पथसंचलनाद्वारे त्यांना सभास्थानी आणले.
Source link
आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते गणवेश, पुस्तके वितरित:अमरावती गर्ल्स हायस्कुलमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा शुभारंभ
