महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील गुळाची सांजोरी हा आजीच्या हातची चव जपणारा खास गोड पदार्थ आहे. खुसखुशीत आवरण आणि गुळाच्या सारणाची गोडी असलेल्या या सांजोऱ्या आठवडाभर टिकतात.‘आपली आजी’ या सोशल मीडिया पेजवर या पारंपरिक सांजोऱ्यांची रेसिपी शेअर करण्यात आली आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक पारंपरिक पदार्थ मागे पडत चालले आहेत. बाजारात विविध प्रकारच्या मिठाया सहज मिळत असल्या, तरी आजीच्या हातच्या सांजोऱ्यांची सर त्यांना येत नाही. विशेष म्हणजे योग्य पद्धतीने बनवल्यास या सांजोऱ्या सुमारे आठवडाभर टिकवून ठेवता येतात. त्यामुळे प्रवासासाठी, पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीला आधीच करून ठेवण्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे. आपली आजी या सोशल मीडियावर पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :- @आपली आजी)
बाहेरील आवरणासाठी
- २ फुलपात्र रवा
- १ वाटी मैदा
- चवीनुसार मीठ
- ३ चमचे साजूक तूप
- आवश्यकतेनुसार पाणी
- तळण्यासाठी तेल
- गुळाच्या सारणासाठी
- १ फुलपात्र गूळ
- सुकं खोबरं
- वेलची पूड
- खसखस
- चारोळी
रवा आणि मैद्याचे पीठ तयार करा
सांजोरी खुसखुशीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे बाहेरील आवरण. त्यासाठी एका परातीत रवा, मैदा आणि चवीनुसार मीठ घ्या. त्यामध्ये साजूक तूप घालून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित चोळून घ्या.तूप आणि रवा-मैदा चांगला एकजीव झाला की थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्या. पीठ ना फार घट्ट असावे ना फार सैल. सांजोरी लाटताना सहज लाटता येईल असे मऊसर पीठ तयार करा.पीठ मळल्यानंतर ते झाकून काही वेळ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रवा व्यवस्थित फुलतो आणि सांजोरीचे आवरण चांगले तयार होते.
गुळाचे चविष्ट सारण
आता सांजोरीसाठी गोड सारण तयार करूया. सर्वप्रथम सुक्या खोबऱ्याचा बारीक किस करून घ्या. कढईमध्ये थोडेसे भाजून घेतल्यास त्याचा सुगंध अधिक छान येतो. त्यानंतर खसखस आणि चारोळी हलक्या हाताने भाजून घ्या.एका कढईत गूळ घ्या. गूळ पूर्णपणे वितळवताना त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे. मात्र गुळाचे पाणी खूप पातळ करू नये. गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले सुकं खोबरं, खसखस आणि चारोळी घाला.शेवटी वेलची पूड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. सारणाला छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम सारण सांजोरीमध्ये भरल्यास बाहेरील आवरण फाटण्याची शक्यता असते.
गुळाची खुसखुशीत सांजोरी रेसिपी
सांजोरी तयार करण्याची पारंपरिक पद्धत
मळलेल्या पिठाचे समान आकाराचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा हाताने थोडा चपट करून त्यामध्ये गुळाचे सारण भरा. सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने कडा बंद करा.आता हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या. सांजोरी फार जाड किंवा फार पातळ लाटू नये. मध्यम जाडीची सांजोरी केल्यास ती तळताना छान फुलते आणि खुसखुशीत होते.सांजोरी लाटताना कडांवर तडे जाऊ नयेत याची काळजी घ्या. तडे गेले तर तळताना सारण बाहेर येऊ शकते.
सांजोरी तळण्याची योग्य पद्धत
कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. सांजोरी तेलात सोडताना तेल खूप कडकडीत गरम नसावे. अन्यथा बाहेरील आवरण लगेच लाल होईल, पण आतून सांजोरी व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही.एकावेळी कढईमध्ये जास्त सांजोऱ्या टाकू नका. प्रत्येक सांजोरीला तळण्यासाठी पुरेशी जागा मिळणे आवश्यक आहे.सांजोरी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत मंद-मध्यम आचेवर तळा. तळलेली सांजोरी झाऱ्याने बाहेर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
आठवडाभर सांजोरी टिकवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
गुळाची सांजोरी आठवडाभर टिकवायची असेल तर काही गोष्टी विशेष लक्षात ठेवणे गरजेचे आहे.पहिली गोष्ट म्हणजे सांजोरी पूर्णपणे तळलेली आणि कुरकुरीत असावी. आत ओलसरपणा राहिल्यास ती लवकर खराब होऊ शकते.
दुसरी गोष्ट म्हणजे तळल्यानंतर सांजोरी पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम सांजोऱ्या डब्यात भरल्यास वाफ तयार होते आणि त्यामुळे त्या नरम पडू शकतात. सांजोरी पूर्ण थंड झाल्यानंतर त्या स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा. डब्यामध्ये ओलावा जाऊ नये याची काळजी घ्या. डबा कोरडा आणि स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.
सांजोरी कशासोबत खावी?
खुसखुशीत गुळाची सांजोरी चहा किंवा कॉफीसोबत खायला अप्रतिम लागते. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी ती सर्व्ह करता येते. सणासुदीला पाहुण्यांना फराळामध्ये सांजोरी देता येते. प्रवासासाठीही ती सोयीची आहे, कारण योग्य प्रकारे तळून हवाबंद डब्यात ठेवल्यास ती काही दिवस चांगली राहते.

