US-Iran Pease Deal Update: अमेरिका आणि इराणमधील शातंता करार आता अगदी जवळ आला असल्याचा दावा केला जात आहे. तरी अणू कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबतच्या अटींवरून दोन्ही देशांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे.

शांतता करार होणार की नाही?
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, येत्या काही दिवसांत या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी होऊ शकते. परंतु, करार अंतिम टप्प्यात आला असला तरी तो पूर्ण झालेला नाही. इराणमधील अंतर्गत निर्णय प्रक्रियेत अनेक गुंतागुंत असल्याने कराराराची तारीख आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, या कराराचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करणे हा आहे. या करारानुसार, इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली करावी लागेल आणि अणूसाठाही नष्ट करावा लागेल.
करार केल्यास इराणला मिळणार अब्जावधी डॉलर्स?
हा करार करताच इराणला अब्जावधी डॉलर्स मिळतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने तो फेटाळून लावला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वाक्षरी करताच इराणला डॉलर्सची एकदम मोठी रक्कम मिळणार नाही, तर इराणने करारातील अटी पाळल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने आर्थिक बक्षीस दिले जाईल. त्यांनी अणू साठा अमेरिकेला सोपवला किंवा तो नष्ट करून देशाबाहेर नेला आणि प्रादेशिक शांततेला पाठिंबा दिला, तरच त्यांना आर्थिक मदत मिळेल.
करार नाहीच, ही केवळ तात्पुरती युद्धबंदी?
दुसरीकडे इराणने मात्र या कराराला शांतता करार न म्हणता केवळ 60 दिवसांची तात्पुरती युद्धबंदी म्हटले आहे. इराणच्या मते, 60 दिवसांच्या युद्धबंदीनंतर अणू कार्यक्रम आणि गोठवलेल्या मालमत्तेच्या विषयावर पुन्हा चर्चा होतील. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, शांतता करार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे, पण ट्रम्प प्रशासनाकडून सतत निर्माण केला जाणार संभ्रम आणि अविश्वासामुळे चर्चा दोन टप्प्यात होतील. इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद गालिबाफ यांनीही एक्सवर (X) पोस्ट करत, ‘दिलेला शब्द पाळावा लागेल, या कोणतीही कारणबाजी चालणार नाही,’ असा इशारा अमेरिकेला दिला आहे.
या वाटाघाटींमध्ये इस्रायलची भूमिका काय?
लक्षात घेण्यासारखा बाब म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेसोबत इराणविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या इस्रायललाच या वाटाघाटींपासून दूर ठेवण्यात आल्याचे दिसते, त्यांनी लेबनॉनमधून माघार घेण्यास नकार दिला आहे. मात्र, या शांतता करारात इस्रायल, लेबनॉन आणि संपूर्ण आखाती देशांचा समावेश असेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान दोन्ही पक्षांशी चर्चा करत असून अंतिम मसुद्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
दुसरीकडे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर इराणला कडक शब्दांत इशारा दिला असून, जाहाजांवरील ड्रोन हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे हा करार खरोखरच शांतता आणणार की युद्ध भडकणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

