पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये मुक्काम करणे सामान्य आहे. मात्र, अलीकडच्या काळात हॉटेलच्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे असण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करताच अवघ्या काही मिनिटांत गुप्त कॅमेरा शोधून काढण्याच्या 7 सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात हे कॅमेरे इतके लहान झाले आहेत की ते बल्ब, घड्याळ, चार्जर किंवा अगदी आरशामध्येही सहज लपवले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी हॉटेलच्याखोलीत प्रवेश करताच 7 सोप्या ट्रिक्स वापरून छुपा कॅमेरा नक्की शोधून काढा.
1. खोलीचे बारकाईने निरीक्षण करा
खोलीत प्रवेश करताच सर्वात आधी सामान्य दिसणाऱ्या वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करा. छुपे कॅमेरे सहसा स्मोक डिटेक्टर, एअर कंडिशनिंग (AC) व्हेंट्स, भिंतीवरील घड्याळ, पॉवर सॉकेट्स, नाईट लॅम्प, फ्लॉवर पॉट किंवा टीव्हीच्या आजूबाजूला लपवले जातात. या वस्तूंमध्ये काही संशयास्पद छिद्र किंवा वायर दिसत असल्यास सावध व्हा.
2. अंधार करून लेन्स शोधा
खोलीतील सर्व दिवे आणि पडदे बंद करून पूर्ण अंधार करा. यानंतर तुमच्या मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू करा आणि खोलीतील सर्व वस्तूंवर प्रकाश टाका. जर कुठेतरी छुपा कॅमेरा लपवला असेल, तर त्याचा काचेचा लेन्स (Lens) मोबाईलच्या प्रकाशाला परावर्तित (Reflect) करेल आणि तुम्हाला अंधारात एक लहान निळा किंवा लाल चमकाणारा ठिपका दिसेल.
3. इन्फ्रारेड लाईट तपासा
अनेक छुपे कॅमेरे अंधारातही रेकॉर्डिंग करण्यासाठी ‘इन्फ्रारेड’ (IR) तंत्रज्ञानाचा वापर करतात. हे किरण मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. अंधार करून तुमच्या मोबाईलचा मुख्य कॅमेरा किंवा फ्रंट कॅमेरा चालू करा आणि संपूर्ण खोलीत फिरवा. जर मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला काही जांभळे किंवा लाल रंगाचे दिवे चमकताना दिसले, तर तिथे कॅमेरा असण्याची दाट शक्यता असते.
4. टू-वे मिरर टेस्ट
बाथरूममधील किंवा खोलीतील आरशाच्या मागे कॅमेरा लपवण्याची पद्धत खूप जुनी आहे. हे तपासण्यासाठी आरशावर तुमचे बोट ठेवा. जर तुमचे बोट आणि आरशातील प्रतिबिंब या दोघांमध्ये थोडं अंतर असेल, तर तो आरसा ओरिजिनल आहे. पण जर बोट आणि प्रतिबिंब एकमेकांना थेट चिकटले असतील, तर तो ‘टू-वे मिरर’ आहे आणि त्याच्या मागे कॅमेरा असू शकतो.
5. मोबाईल कॉलिंग पद्धत
छुपे कॅमेरे काम करताना विशिष्ट रेडिओ लहरी उत्सर्जित करतात. हे तपासण्यासाठी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला फोन लावा आणि खोलीत फिरत फिरत बोलण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्या विशिष्ट वस्तूच्या जवळ गेल्यावर फोनच्या आवाजात अडथळा निर्माण झाला, तर समजावे की तिथे एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा कॅमेरा सक्रिय आहे.
6. Wi-Fi नेटवर्क स्कॅन करा
आजकालचे बहुतांश डिजिटल कॅमेरे लाईव्ह फुटेज पाठवण्यासाठी हॉटेलच्या वाय-फाय नेटवर्कशी जोडलेले असतात. तुमच्या मोबाईलमध्ये ‘Fing’ किंवा ‘Hidden Camera Detector’ सारखे मोफत ॲप्स डाउनलोड करा. हॉटेलच्या वाय-फायशी कनेक्ट होऊन हे ॲप वापरल्यास त्या नेटवर्कवर सध्या कोणते संशयास्पद कॅमेरे किंवा डिवाइसेस ऑनलाइन आहेत, याची यादी तुम्हाला मिळते.
7. संशयास्पद वस्तू झाकून ठेवा
जर तुम्हाला खोलीतील एखाद्या वस्तूवर संशय असेल (उदा. सेट-टॉप बॉक्स किंवा टेबल क्लॉक) आणि तुमच्याकडे तपासण्यासाठी वेळ नसेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या वस्तूवर टॉवेल, कपडा किंवा काळी पट्टी लावा. कॅमेऱ्याचा लेन्स झाकला गेल्यामुळे तुमची गोपनीयता सुरक्षित राहील.

